मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय, संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर
राऊत यांनी पुढे आरोप केला की, पंतप्रधानांच्या वक्तव्यांकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करत आहेत.
Sanjay Raut’s reply to Prime Minister Narendra Modi : लोकसभेत नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 एप्रिल रोजी देशाला संबोधित करत विरोधकांवर जोरदार टीका केली. विधेयकाची भ्रूणहत्या करण्यात आली, अशा कठोर शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या भाषणानंतर आता संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर पलटवार करत तीव्र टीका केली आहे. पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी थेट मागणी करत राऊत म्हणाले की, काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारे मोदी कालच्या भाषणात वारंवार काँग्रेसचं नाव घेत होते.
राऊत यांनी पुढे आरोप केला की, पंतप्रधानांच्या वक्तव्यांकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करत आहेत. खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार त्यांना जडला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, याबाबत मोदींनी देशाची माफी मागायला हवी, असे देखील ते म्हणाले.
डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तुमच्या मर्जीनुसार आणलेलं डिलिमिटेशन विधेयक पराभूत झालं. हे राष्ट्रावरचं संकट नसून भाजपवरचं संकट आहे. पक्षाच्या अडचणींचा देशाला संबोधीत करणं हा मूर्खपणा आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसविषयी बोलताना राऊत म्हणाले, मोदींच्या डोक्यातून काँग्रेस गेलेली नाही. त्यांच्या भाषणात तब्बल 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. काँग्रेसयुक्त भारताची घोषणा करणारेच आज अप्रत्यक्षपणे मान्य करत आहेत की, काँग्रेसशिवाय देशाला नेतृत्व देणं कठीण आहे.
विरोधकांनी डान्स करावा वक्तव्यावरून वाद; दमानियांचा फडणवीसांना खोचक सवाल, आधी 33% महिला मंत्री करा
तसेच समाजातील संवेदनशील मुद्द्यांवरून देखील त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. लव्ह जिहाद, धर्मांतर किंवा लोकांनी काय खावं यासारखे मुद्दे पुढे करून देशात तणाव निर्माण केला जातो. मात्र, काश्मीरमधील पहलगाम आणि पुलवामासारख्या घटनांमध्ये जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांचा आक्रोश त्यांना कधीच दिसत नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
महिला आरक्षण विधेयकाच्या अपयशानंतर सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.