Donald Trump’s major announcement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या निर्णयांमुळे आणि वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. इमिग्रेशन धोरण,एच वन बी व्हिसा, आयात शुल्क, इराणसंबंधीची भूमिका आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर आता त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी एआय या संज्ञेचे नामांतर करण्याचा निर्णय जाहीर केला.
ट्रम्प यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऐवजी सुपर इंटेलिजन्स ही संज्ञा वापरण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून त्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या मते, एआय ही केवळ कृत्रिम प्रणाली नसून मानवी क्षमतांना अनेक पटींनी वाढवणारे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलणारे साधन आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाऐवजी सुपर इंटेलिजन्स हा शब्द या तंत्रज्ञानाची क्षमता अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो.
यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव बदलण्यासाठी मी एका प्रस्तावावर स्वाक्षरी करत आहे. कारण ते कृत्रिम नाही आणि याबाबत उपस्थित सर्वजण सहमत आहेत. आता एआय ऐवजी एसआय अर्थात सुपर इंटेलिजन्स ही संज्ञा वापरली जाईल. हे तंत्रज्ञान इंटरनेटपेक्षाही मोठा बदल घडवू शकते. आपल्या देशासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोड आहे.
Gold Market : सोनं बाजारात नवा ट्रेंड… बिल घेतलं तर महाग, बिल न घेतल्यास स्वस्त?…
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीला तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, संगणकीय क्षमता आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील अमेरिकेचे नेतृत्व कायम राखण्यासाठी आवश्यक धोरणांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. एआय क्षेत्रातील वाढती स्पर्धा, चीनसारख्या देशांकडून मिळणारे आव्हान आणि नव्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक यावरही विशेष भर देण्यात आला.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, सुपर इंटेलिजन्स ही संज्ञा आधीपासूनच अत्यंत प्रगत आणि मानवी बुद्धिमत्तेपेक्षा अधिक सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींसाठी वापरली जाते. त्यामुळे एआय आणि सुपर इंटेलिजन्स या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या तंत्रज्ञानाच्या प्रचंड क्षमतेला अधोरेखित करण्यासाठी हे नामांतर करण्यात आले आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या सरकारी यंत्रणांमध्ये, अधिकृत कागदपत्रांमध्ये आणि तंत्रज्ञानविषयक धोरणांमध्ये एआय ऐवजी एसआय ही संज्ञा वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अमेरिकेने नव्या शब्दप्रयोगाची सुरुवात केल्याची चर्चा सध्या जागतिक स्तरावर रंगत आहे.
