Gold Market : सोनं बाजारात नवा ट्रेंड… बिल घेतलं तर महाग, बिल न घेतल्यास स्वस्त?…
Shadow Gold Market : सध्या महाग सोनं आणि त्यावरचा कर यामुळे ग्राहकांमध्ये वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे.
India’s Shadow Gold Market Booms : सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला की खरेदीचा हिशेबही बदलतो. मात्र, सध्या महाग सोनं आणि त्यावरचा कर यामुळे ग्राहकांमध्ये वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोनं मिळवण्यासाठी काही ग्राहक पावती न घेता रोखीने व्यवहार करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, अशा व्यवहारांमध्ये प्रति 10 ग्रॅम 5 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत असल्याचा दावा केला जात आहे. लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना सोन्याची मागणी कायम आहे. मात्र, वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ‘बिल नको, किंमत कमी करा’ असा पर्याय काही ग्राहक स्वीकारताना दिसत आहेत. या व्यवहारांमुळे अधिकृत बाजारपेठेच्या समांतर असलेल्या ‘शॅडो मार्केट’ची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पावती नको, पण हजारोंची बचत हवी…
सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे अगदी काही टक्क्यांची बचतही ग्राहकांसाठी मोठी ठरत आहे. या क्षेत्राशी संबंधित काही व्यक्तींच्या माहितीनुसार, रोखीने आणि पावतीशिवाय सोनं खरेदी केल्यास काही व्यवहारांमध्ये बाजारभावाच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. प्रकाशित वृत्तांनुसार दिल्लीतील एका ग्राहकाने मुलीच्या लग्नासाठी दागिने खरेदी केले. पावती न घेता व्यवहार केल्यामुळे या ग्राहकाला प्रति 10 ग्रॅम 5 हजार रुपयांची सूट मिळाल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला असून, एकूण खरेदीत त्याची तब्बल 60 ते 70 हजार रुपयांची बचत झाल्याचा दावा आहे. म्हणजेच, सोनं जितकं महाग होतंय, तितकाच काही ग्राहकांचा ‘पावती नको, किंमत कमी हवी’ हा कल वाढताना दिसतोय.
नेमकं सोनं इतकं महाग का?
भारतात सोन्याची मागणी मोठी आहे, मात्र देशांतर्गत उत्पादन त्या तुलनेत कमी असल्याने मागणी मोठ्या प्रमाणावर आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळे सोन्याची आयात ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब ठरते. याच पार्श्वभूमीवर सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्यात आले. अधिकृत मार्गाने आयात होणाऱ्या सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो. त्यात ग्राहकांना 3 टक्के GST द्यावा लागतो. परिणामी अधिकृत बाजारातील सोन्याची अंतिम किंमत आणखी वाढते. याच किमतीतून बचत करण्यासाठी काही ग्राहक अनौपचारिक व्यवहारांकडे वळत असल्याचे सांगितले जात आहे.
‘शॅडो मार्केट’ पुन्हा चर्चेत
भारतामध्ये अनौपचारिक सोन्याचा व्यापार नवीन नाही. मात्र, आयात शुल्क कमी असताना अधिकृत मार्गाला बगल देण्याचा आर्थिक फायदा तुलनेने कमी होता. आता सोन्याच्या किमती वाढल्या आहेत आणि शुल्काचा भारही मोठा आहे. त्यामुळे अधिकृत बाजारातील किंमत आणि अनौपचारिक व्यवहारातील किंमत यातील फरक वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मध्य-पूर्व आणि आशिया क्षेत्रातील ‘मॉनेटरी मेटल्स’चे व्यवस्थापकीय संचालक हिरेन चंडारिया यांच्या मते, अनौपचारिक बाजारातील मोठी सूट ही ‘शॅडो सप्लाय’च्या अर्थव्यवस्थेकडे निर्देश करते.
भारतात सोन्याची मागणी एवढी का?
भारत हा जगातील सोन्याच्या मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे. लग्नसमारंभ, सण, धार्मिक कार्यक्रम तसेच कुटुंबाची बचत म्हणून सोन्याला मोठे महत्त्व आहे. विशेषतः ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचा लग्न आणि सणांचा काळ सोन्याच्या बाजारासाठी महत्त्वाचा असतो. अशा वेळी सोन्याचे दर आधीच मोठे असताना त्यावर कर आणि इतर शुल्काचा भार वाढला, तर ग्राहक स्वस्त पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात.
सोनं स्वस्त मिळतंय, पण जोखीम कोणाची?
पावती न घेता केलेल्या व्यवहारात ग्राहकाला तात्काळ काही हजार रुपयांची बचत मिळू शकते. मात्र, पावती किंवा अधिकृत बिल नसल्यामुळे खरेदीचा पुरावा राहत नाही. भविष्यात सोनं विकताना, बदलताना किंवा व्यवहाराशी संबंधित कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास अधिकृत कागदपत्रांचा अभाव अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे महाग सोन्यात काही हजारांची बचत होत असली, तरी ‘बिल नसलेलं सोनं’ नेमकं किती फायदेशीर आणि किती जोखमीचं? हा प्रश्नही ग्राहकांसमोर आहे.