रुपयाची घसरण, सोन्याची भरारी! 10 ग्रॅमचा दर तब्बल 1.06 लाखांवर

Gold Prices High India Rupee Falling : सोन्याच्या किमतींनी (Gold Prices) आज (1 सप्टेंबर) नवा उच्चांक गाठला. देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल ₹1.06 लाखांवर पोहोचला. कमकुवत रुपया (India Rupee) आणि जागतिक पातळीवरील सुरक्षित गुंतवणुकीकडे (US Dollar) कल या दोन्ही घटकांमुळे सोन्याच्या भावात उसळी आली.
जागतिक घडामोडींचा परिणाम
जागतिक बाजारातही सोन्याने चार महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून या महिन्यात व्याजदर कपातीची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली. सॅन फ्रान्सिस्को फेडच्या अध्यक्ष मेरी डेली यांनीही व्याजदर कपातीला पाठिंबा दिला. त्यानंतर CME FedWatch नुसार सप्टेंबरमध्ये 25 बेसिस पॉइंट दरकपातीची शक्यता तब्बल 87 टक्के इतकी वाढली आहे.
डॉलरचा दबाव, ट्रम्प यांचे टॅरिफ्स बेकायदेशीर
नॉन-यिल्डिंग म्हणजेच व्याज न मिळणाऱ्या सोन्याला कमी व्याजदराच्या काळात नेहमीच मागणी वाढते. याशिवाय अमेरिकन डॉलरही कमकुवत झाला आहे. कोर्टाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बहुतेक टॅरिफ्स बेकायदेशीर ठरवल्याने अमेरिकेच्या व्यापार धोरणावर अनिश्चितता वाढली. परिणामी, सोन्याचे आकर्षण अधिक वृद्धिंगत झाले. भारतामध्ये मात्र सोन्याच्या किमती जागतिक बाजारपेक्षा झपाट्याने वाढल्या. कारण रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला. अमेरिकेने भारतीय मालावर उच्च टॅरिफ लावल्यामुळे वाढलेल्या व्यापार तणावामुळेही गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केली.
राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी
तज्ज्ञांचे मत काय?
मेहता इक्विटीजचे कमॉडिटी व्हाईस प्रेसिडेंट राहुल कलंत्री म्हणाले की, जागतिक तसेच देशांतर्गत स्तरावर वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किमतींना जोरदार आधार मिळाला आहे. कमजोर रुपयामुळे ही वाढ अधिक वेगाने झाली. त्यांनी पुढे सांगितले की, तांत्रिक दृष्टिकोनातून सोन्याला ₹1.03 लाख–₹1.02 लाख या दरांवर आधार (सपोर्ट) आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष आता 5 सप्टेंबरला जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या नॉन-फार्म पे-रोल्स डेटाकडे आहे. या आकडेवारीवरून फेडचा अंतिम व्याजदराचा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांसाठी बुलियन मार्केटचा ट्रेंड ठरेल.