नवी दिल्ली : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy) आठ निवृत्त अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय अपिलीय न्यायालयाने घेतला होता. मात्र त्यानंतर लगेचच या सर्वांना तीन ते 25 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिले आहे. याबाबत अद्याप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Eight retired Indian Navy officers who were arrested in Qatar a few days ago were sentenced to jail)
हेरगिरी प्रकरणात गतवर्षी आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आले होते. तेव्हापासून हे सर्वजण तुरुंगातच होते. त्यानंतर कतारमधील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने मुत्सद्देगिरीचा वापर करत या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. यानंतर कतार सरकारकडून सर्वांची फाशी जन्मठेपेच्या शिक्षेत बदलली होती. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, आठही जणांना तीन ते 25 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ जणांपैकी एकाला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची, चौघांना 15 वर्षांचा तुरुंगवास, दोघांना 10 वर्षांची आणि एकाला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी निर्णय वाचेपर्यंत तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे कोणतीही अतिरिक्त माहिती नाही. शिक्षा कमी करण्यात आल्या आहेत. परंतु जोपर्यंत आमच्याकडे निर्णयाशी संबंधित तपशील मिळत नाहीत, तोपर्यंत मी टिप्पणी करू इच्छित नाही. आम्ही कायदेशीर टीम आणि कुटुंबातील सदस्यांसह पुढील संभाव्य पायऱ्यांबद्दल नक्कीच चर्चा करू.
तुरुंगवासाची शिक्षा तीन वर्षापासून ते 25 वर्षांपर्यंत सुनावली आहे का? यावर उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की, अंदाज बांधू नका. भारतीय अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे हित हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. खटल्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही सर्व कायदेशीर मदत देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कतारमध्ये अल दाहरा या खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. पूर्णेंदू तिवारी, सुगुनाकर पाकला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंग गिल, बिरेंद्र कुमार वर्मा, सौरभ वशिष्ठ आणि रागेश गोपकुमार अशी अटक केलेल्या आठ अधिकाऱ्यांची नावे आहेत. कतार येथील एका गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहे. दरम्यान कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने या माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यानंतर अखेर या प्रकरणामध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आले.