Download App

Explainer : विमान अपघाताच्या घटना का वाढल्यात? कारणं अन् उपाय दोन्ही बाजू समजून घ्याच!

विमान क्रॅश होण्याच्या घटना नेमक्या घडतात कशा, काय कारणं आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली आहे.

Plane Crash : दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरिया आणि त्यापाठोपाठ कॅनडात विमान अपघातांच्या घटना घडल्या. दक्षिण कोरियातील विमानाचा अपघात तर इतका भीषण होता की यात दीडशे पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने विमान दुर्घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विमान क्रॅश होण्याच्या घटना नेमक्या घडतात तरी कशा, यामागे काय कारणं आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी काय करता येईल यावर आता चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊ या डिटेल..

तज्ज्ञांच्या मते हवाई दुर्घटना अनेक कारणांमुळे होतात. यामध्ये पायलटची चूक, तांत्रिक बिघाड, खराब हवामान तसेच काही वेळेला विमान कंपन्यांचा हलगर्जीपणा देखील या अपघातांना कारणीभूत ठरतो. या व्यतिरिक्त आणखी काही कारणे आणि उपाय यांवरही विचार करणे गरजेचे आहे.

Wisner Baum संस्थेच्या अलीकडील एका अहवालात या घटनांच्या संदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. फर्मने एव्हीएशनमध्ये तज्ज्ञांच्या हवाल्याने याबाबतीत सांगितलं आहे. विमान अपघाताच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कठोरपणे लागू करणे आणि तांत्रिक त्रुटी वेळेवर दूर करून सुधारणा करणे आवश्यक आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यानुसार धोरणात बदल करण्याचीही गरज आहे.

Explainer : अमेरिकेला का हवंय सेंट मार्टिन बेट? जाणून घ्या, बांग्लादेशच्या सत्तापालटाचं कनेक्शन..

पायलट आणि क्रू मेंबरची चूक

या रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की हवाई दुर्घटनांमध्ये पायलटची चूक हे एक मोठे कारण आहे. जवळपास 53 टक्के अपघात पायलटच्या निष्काळजीपणामुळे घडतात. विमान चालवत असताना वैमानिकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. खराब हवामान, तांत्रिक बिघाड आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. या व्यतिरिक्त क्रू मेंबरच्या लहान चुका देखील मोठ्या संकटाला आमंत्रण देतात.

एअरक्राफ्ट देखभालीकडे दुर्लक्ष

विमानांची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बऱ्याच वेळेस विमान कंपन्या याकडे कानाडोळा करतात. जे प्रवाशांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर सन 2000 मधील अलास्का एरलाईन्स फ्लाईट 261 च्या अपघाताचं देता येईल. या विमान अपघातामागे विमानाच्या मेंटेनन्समध्ये कमतरता हे मुख्य कारण सांगण्यात आलं होतं. अशा निष्काळजीपणा मुळे एखादं विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचा धोका खूप जास्त असतो.

तांत्रिक त्रुटी ठरतात धोकादायक

विमानाचे डिझाईन आणि निर्माणातील त्रुटी विमान अपघाताचं कारण ठरू शकतात. विमानाचा प्रत्येक भाग हवा, टेक ऑफ, लँडिंगचा तणाव सहन करण्यासाठी मजबूत असावा लागतो. यातील त्रुटींमुळे 20 टक्के अपघात होतात. अशा परिस्थितीत विमान कंपन्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक ठरते.

हवामानाचा परिणाम

खराब हवामानामुळे जवळपास 12 टक्के विमान अपघात होतात. पण तज्ज्ञांच्या मते यासाठी फक्त हवामानच कारणीभूत ठरत नाही. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी देणे किंवा या दरम्यान योग्य निर्णय न घेणे यात पायलट आणि एअरलाईन्सचा निष्काळजीपणा दर्शवतो.

विमान कंपन्यांचा हलगर्जीपणा

आजकाल विमान कंपन्या वेळ आणि खर्च यामध्ये बचत करण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पायलट आणि क्रू मेंबर्सवर दबाव टाकून त्यांना घाईगडबडीत निर्णय घेण्यास भाग पाडले जात असल्याचे बोलले जात आहे. यात किती तथ्य आहे हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. कॉर्पोरेट जगतातील ही संस्कृती विमान प्रवास धोकादायक करत आहे.

एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये गडबड

एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये लहानशी चूक देखील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. सन 1991 मध्ये लॉस एंजेलिसमधील विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये निष्काळजीपणा झाल्यामुळे दोन विमानांची धडक झाली. या अपघातात 35 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विमान अपघात रोखण्यासाठी या गोष्टींचा विचार करून त्यात सुधारणा घडवून आणण्याची आज गरज आहे.

follow us