Download App

मोठी घडामोड! ब्रिक्समध्ये इंडोनेशियाची एन्ट्री, पाकिस्तान अस्वस्थ; चीनचाही प्लॅन फेल

सन 2009 मध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स संघटनेचा सातत्याने विस्तार होत आहे. आता या संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे.

BRCIS News : सन 2009 मध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स संघटनेचा सातत्याने विस्तार होत आहे. आता या संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे. दक्षिण पूर्व आशियातील इंडोनेशिया आता ब्रिक्स संघटनेचा (BRICS) सदस्य बनला आहे. सोमवारी ब्राझीलने या निर्णयाची घोषणा केली. परंतु या नव्या घडामोडीमुळे पाकिस्तान चांगलाच (Pakistan) अस्वस्थ झाला आहे. या संघटनेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तान अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अनेक वेळा चीनमार्फत तजवीज करण्याचा प्रयत्न सुद्धा करून पाहिला आहे. परंतु अद्याप यश मिळालेलं नाही.

ब्रिक्स संघटनेत (BRICS) सहभागी होणारा इंडोनेशिया अकरावा देश बनला आहे. याआधी इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना ब्रिक्सचे पूर्ण सदस्य करण्यात आले होते. यानंतर इंडोनेशियाच्या प्रस्तावाला (Indonesia) 2023 मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या संमेलनात मंजुरी देण्यात आली होती.

ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ब्रिक्समध्ये इंडोनेशियाच्या प्रवेशाचे ब्राझील सरकार स्वागत करत आहे. दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक लोकसंख्येच्या इंडोनेशिया ब्रिक्समधील सदस्य देशांसोबत जागतिक संस्थांमध्ये सुधारणांना पाठिंबा देत आहे.

चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे

ब्राझीलकडे अध्यक्षपद

ब्रिक्सची अध्यक्षता यंदा ब्राझील करत आहे. या वर्षातील जुलै महिन्यात ब्रिक्स संमेलन होणार आहे. ब्राझीलची राजधानी रिओ डी जेनरियो या शहरात हे संमेलन होणार आहे. यावेळी ग्लोबल साऊथ अशी थीम आहे. सदस्य देशांतील व्यापार अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने पेमेंट गेट वे मध्ये सुधारणा करणे हा उद्देश निश्चित करण्यात आला आहे.

याआधी नोव्हेंबर महिन्यात रशियात संमेलन (Russia) झाले होते. या संमेलनात स्थानिक चलनाला अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली होती. परंतु अमेरिका यावर चांगलाच भडकला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) सदस्य देशांवर 100 टक्के टॅरिफ आकारण्याची धमकी दिली होती.

कशी झाली बिक्सची सुरुवात

सन 2009 मध्ये ब्राझील, चीन, भारत आणि रशिया या देशांनी मिळून ब्रिक्स संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेचे पहिले संमेलन रशियातील येकातेरीनबर्ग शहरात झाले होते. त्यानंतर 2010 मध्ये न्यूयॉर्क मध्ये सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत संघटनेत दक्षिण आफ्रिकेला सहभागी करून घेण्यावर एकमत झाले होते.

चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान, हॉस्पिटल्स फुल्ल; 5 वर्षांनंतर भयावह स्थिती, काय घडलं?

सन 2011 मध्ये सान्यामध्ये झालेल्या संमेलनात दक्षिण आफ्रिकेने सहभाग घेतला होता. यानंतर 2024 मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युएईला ब्रिक्समध्ये सहभागी करून घेण्यात आले. आता या संघटनेची लोकप्रियता वाढत चालली आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान देखील यामध्ये सहभागी होऊ इच्छित आहे. पण पाकिस्तानच्या प्रयत्नांना अजून तरी यश मिळालेलं नाही.

follow us