Download App

Luna 25 Launch : चंद्रावर भारताचा शेजारी होणार रशिया! तब्बल 47 वर्षांनंतर धाडले चांद्रयान

भारताच्या चांद्रयानाचा चंद्राकडे जाण्याचा प्रवास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच रशियानेही चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. तब्बल 47 वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्रमोहिम असणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न रशिया करणार आहे. आज पहाटे 4.40 वाजता अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आले. यासाठी सोयूज 2.1 रॉकेटची मदत घेण्यात आली.

याआधी रशियाने 1976 साली पहिल्यांदा चंद्रावर लूना 25 यान पाठवले होते. या यानाचे प्रक्षेपण युरोपीय स्पेस एजन्सीच्या मदत न घेता करण्यात आले होते. आता या एजन्सीने युक्रेन युद्धानंतर रशियाबरोबरील करार संपुष्टात आणला आहे. आता रशियाने प्रक्षेपित केलेले चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचेल असे सांगितले जात आहे. याच दिवशी भारताचेही चांद्रयान चंद्राच्या जमिनीवर अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही देशांनी आपापली चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत कोणतेही यान सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलेले नाही. फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांच्या यानांनीच ही कामगिरी करून दाखवली आहे. सर्व काही ठीक राहिले तर लूना 25 आणि चांद्रयान3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील उपस्थितीने दोन्ही देश चंद्रावर शेजारी नक्कीच होतील.

चांद्रयान 3 ने पाठवला पहिला Video; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसचे प्रमुख युरी बोरिसोव यांनी सांगितले की लूनाचे लँडर 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरू शकते. याआधी 23 ऑगस्ट ही तारीख सांगण्यात येत होती. रशियाचे लूना 25 हे चांद्रयान एका लहान कारच्या आकाराचे आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक वर्षांपर्यंत काम करण्यासाठी हे बनविण्यात आले आहे.

23 ऑगस्ट चांद्रयान3 ची अग्निपरीक्षा
आता 23 ऑगस्ट ही भारताच्या चांद्रयानसाठी सर्वात महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करायचे आहे. गेल्या वेळी भारताचे चांद्रयान 2 या टप्प्यावर अयशस्वी झाले होते. पण आता चांद्रयान 3 पूर्ण तयारीनिशी चंद्राकडे वाटचाल करत आहे. यावेळी इंधन क्षमता देखील वाढवण्यात आली आहे जेणेकरून लँडरला लँडिंगची जागा शोधण्यात अडचण येत असेल तर ते सहजपणे वैकल्पिक लँडिंग साइटवर हलवता येईल. चांद्रयान-3 सुमारे 615 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आले आहे. जानेवारी 2020 च्या एका अहवालात, इस्रोच्या अध्यक्षांनी मिशनसाठी लँडर रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलची किंमत सुमारे 250 कोटी रुपये असेल, तर प्रक्षेपणासाठी 365 कोटी रुपये खर्च येईल असे नमूद केले होते.

 

Tags

follow us