Pakistan Financial Crisis : भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा (Pakistan Financial Crisis) सामना करत आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. रोजगाराची दुर्दशा झाली आहे. लोकांना रोजच्या वस्तू मिळवण्यासाठी सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भारतात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य भाजप नेते पाकिस्तानच्या या कंगालीचा मुद्दा भाषणात उपस्थित करत असतात. खरंच आज पाकिस्तानात अशी परिस्थिती आहे का? दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले असताना आज भारत कुठे आहे आणि पाकिस्तानची काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊ या..
पाकिस्तानवर आज कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. सरकारी खर्चासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी पाकिस्तानला वारंवार युएई, सौदी अरेबिया, चीन, तुर्कीसारख्या देशांकडे मदतीची याचना करावी लागत आहे. चीन आणि सौदी अरबनंतर आता युएई पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आला आहे. पाकिस्तानला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक कोटी डॉलरची मदत केली जाईल पण हा पैसा गुंतवणुकीच्या स्वरूपात दिला जाईल, असे संयुक्त अरब अमिरातीने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ सध्या युएई दौऱ्यावर आहेत. शरीफ यांनी यूएईच्या राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना देशासमोरील संकटांची माहिती दिली. यानंतर राष्ट्रपती पाकिस्तानला मदत करण्यास तयार झाले. यूएई आता पाकिस्तानातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला काहीसा दिलासा मिळाला आहे. पण जर मागील 63 वर्षांचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानची आजच्या इतकी वाईट अवस्था नव्हती. फाळणीनंतरच्या तीस वर्षांच्या काळात विकास दर विक्रमी होता.
बुलेट ट्रेनचा रिव्हर्स गिअर! चीनमधील रेल्वे स्टेशन्स का होताहेत धडाधड बंद?
1961 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 3.72 टक्के होता तर पाकिस्तानचा जीडीपी विकास दर 5.99 टक्के होता. या तीस वर्षांच्या काळात पाकिस्तानचा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच जीडीपी ग्रोथ रेट भारतापेक्षा जास्त होता. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 1965, 1970 आणि 1980 या तीन वर्षात पाकिस्तानचा जीडीपी ग्रोथ रेट 10 टक्क्यांपेक्षाही जास्त होता.
1965 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी ग्रोथ रेट 10.42 टक्के होता. याच वर्षात भारताचा जीडीपी ग्रोथ रेट अतिशय कमी होता. यावेळी भारताचा ग्रोथ रेट -2.64 टक्के होता. सन 1970 मध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा जीडीपी ग्रोथ रेट निम्मा होता. ज्यावेळी पाकिस्तान 11.35 टक्के दराने विकास करत होता त्यावेळी भारताचा ग्रोथ रेट 5.16 टक्के होता.
1980 सालाचा विचार केला तर पाकिस्तानचा ग्रोथ रेट 10.22 टक्के होता तर याच वेळी भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 6.74 टक्के होता. 1965 आणि 1979 या दोन वर्षांत भारताचा ग्रोथ रेट मायनस मध्ये होता. 1965 मध्ये -2.64 टक्के आणि 1979 मध्ये -5.24 टक्के असा दर होता. 1992 पर्यंत भारताच्या तुलनेत पाकिस्तान मजबूत होता पण यानंतर चित्र बदलण्यास सुरुवात झाली. भारताने वेगाने प्रगती करत पाकिस्तानला मागे टाकले. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर पाकिस्तान कर्ज मिळविण्यासाठी धडपड करत आहे.
रशियाला दणका! लहानशा देशानेही वटारले डोळे; रशियन पर्यटकांना नो एन्ट्री
सन 2020 मध्ये मात्र दोन्ही देशांच्या विकास दरात घसरण झाल्याचे दिसून आले होते. यावेळी भारताचा विकास दर पाकिस्तानपेक्षाही कमी झाला होता. हा कोरोना संकटाचा काळ होता. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र बिघडले होते. सन 2020 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी ग्रोथ रेट -1.27 टक्के तर भारताचा जीडीपी ग्रोथ रेट -5.83 टक्के झाला होता. 2021 मध्ये 9.05 टक्के तर 2022 मध्ये 6.51 टक्क्यांसह भारताने पुन्हा भरारी घेतली. या दोन वर्षात पाकिस्तानचा जीडीपी ग्रोथ रेट मात्र 7.24 टक्के आणि 4.71 टक्के राहिला.