Russia Pakistan : रशियाने स्पष्ट केले आहे की ब्रिक्स संघटनेत (BRICS) सहभागी होण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या (Pakistan) प्रयत्नाचे आम्ही समर्थन करू. व्यापार आणि सांस्कृतिक सबंधांना प्रोत्साहन देऊन आपसातील संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशियाचे (Russia) उपपंतप्रधान अलेक्सी ओवरचूक दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भारताची डोकेदुखी वाढविणारे वक्तव्य केले.
आम्हाला आनंद आहे की पाकिस्तानने अर्ज केला आहे. BRICS आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनेजेशन (SCO) मैत्रीपूर्ण संघटना आहे. आम्ही पाकिस्तानच्या सदस्यत्वाच समर्थन करू असे रशियाचे डेप्युटी पीएम अलेक्सी ओवरचूक यांनी सांगितले. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था TASS नुसार ओव्हरचूक यांनी सांगितले की मागील काही वर्षांत ब्रिक्स संघटनेचा विस्तार झाला आहे. जगभरातील देशांनी या संघटनेत सहभागी होण्यात रस दाखवला आहे.
जगभरात ब्रिक्सचा धाक वाढला
ब्रिक्स संघटनेची स्थापना सन 2006 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने एकत्र येत केली होती. यानंतर 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका या संघटनेत सहभागी झाला. 1 जानेवारी 2024 रोजी इजिप्त, इराण, युएई, सौदी अरब, इथिओपिया या संघटनेचे पूर्ण सदस्य बनले आहेत. तर पाकिस्तान आधी तुर्किने सुद्धा या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी रशियानेच याबाबत माहिती दिली होती.
पाकिस्तानला झटका, चीनी कंपन्यांना दणका; अमेरिकेने ‘या’ प्रोजेक्टवर केली मोठी कारवाई
पाकिस्तान रशिया व्यापारी संबंधात वाढ
रशियाचे डेप्युटी पीएम आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की दोन्ही देशात आर्थिक संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. मागील वर्षात दोन्ही देशांतील व्यापराने एक अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केल्याचे परराष्ट्रमंत्री डार यांनी सांगितले. ऊर्जा सहकार्य क्षेत्रातही व्यापार वाढीची संधी आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रकल्पांवर रशियाबरोबरच काम करण्याचे पाकिस्तान सरकारचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.
रशियाचे डेप्युटी पीएम अलेक्सी ओव्हरचूक यांनी सांगितले की सहकार्याच्या बाबतीत पाकिस्तान आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन (यामध्ये अर्मेनिया, बेलारूस, कजाकस्तान, काकेशिया आणि रशिया यांचा समावेश आहे) बरोबर चर्चा केली आहे. पाकिस्तान आणि या पाच देशांदरम्यान फ्री ट्रेड अग्रीमेंट लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. आम्ही या कराराला पुढे घेऊन जाण्यात आणि अंतिम रूप देण्यात तत्पर आहोत.
पाकिस्तान रशियाच्या मैत्रीचे कारण काय
माहितीनुसार रशिया पाकिस्तान बरोबर व्यापारिक संबंध वाढवत आहेच शिवाय रशिया पाकिस्तानला शस्त्रे विकण्याच्याही विचारात आहे. युक्रेन युद्धामुळे पश्चिमी देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे काही ठराविक देशांबरोबरच व्यापार सुरू आहे. देशातील आर्थिक संकट कमी करण्यासाठी रशिया पाकिस्तान प्रमाणेच आणखी काही देशांबरोबर आर्थिक सहकार्य वाढविण्यावर भर देत आहे. सन २०१६ पासून रशिया आणि पाकिस्तान नियमितपणे संयुक्त सैन्य अभ्यास करत आहे.
मोठी बातमी! रशिया युक्रेनसोबत चर्चेस तयार; पुतिन म्हणाले, भारत-चीन करू शकतात मध्यस्थी
ब्रिक्स संघटनेला नाटोचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. नाटोला टक्कर देण्यासाठी रशिया आणि चीन ब्रिक्स संघटनेचा विस्तार करू इच्छित आहेत. पाकिस्तानच्या आधी तुर्कीने या संघटनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. जर हे दोन्ही देश ब्रिक्स मध्ये सहभागी झाले तर चीनचा प्रभाव वाढण्याची दाट शक्यता आहे.
ओव्हरचूक यांनी सांगितले की SCO मध्ये विकास आणि आर्थिक संबंधांच्या बाबतीत पाकिस्तान आणि रशियाचे व्हिजन एकसारखे आहे. कनेक्टिव्हिटी, ग्लोबल वॉर्मिग, अन्न सुरक्षा, ऊर्जा ट्रान्समिशन आणि ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही देशांचे विचार एकसारखे आहेत. येत्या १५ आणि १६ ऑगस्ट रोजी पाकिस्तानात होणार आहे. यासाठी पाकिस्तानने भारतासह अन्य देशांना निमंत्रण पाठवले आहे.