Vladimir Putin Russia : मागील दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) थांबलेले नाही. या विनाशकारी युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. यातही युक्रेनला जास्त नुकसान सहन करावं लागलं आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही युक्रेनला भेट दिली होती. यानंतर आता युद्धाच्या मैदानातून महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युद्ध तत्काळ थांबवण्यास तयार असून तत्काळ युद्धविराम लागू करू असे म्हटले आहे.
भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, अन् रशियाकडून तेल खरेदी थांबवावी; झेलेन्स्कींची मोदींना साद
युक्रेनमध्ये संभावित शांततेच्या चर्चेत चीन, भारत आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिक बजावू शकतात. पुतिन ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. पुतिन पुढे म्हणाले, युक्रेनचा डोनबास हा प्रांत ताब्यात घेणे हे आपले उद्दीष्ट आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या सैनिकांनी कुर्स्क भागातून मागे फिरण्यास भाग पाडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केला होता. याआधी त्यांनी रशियाचाही दौरा केला होता. पीएम मोदींचे हे दोन्ही दौरे अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या या दोन्ही दौऱ्यांची जागतिक स्तरावर मोठी चर्चा झाली होती.
पीएम मोदींनी जुलै महिन्यात रशियाचा दौरा केला होता. नाटो समिट सुरू असतानाच त्यांचा हा दौरा चर्चेचा ठरला होता. या दौऱ्यात पुतिन आणि मोदी यांच्या गळाभेटीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावेळीही मोदींनी युद्धाच्या मैदानातून शांततेचा रस्ता निघू शकत नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींना रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द एपोस्टल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली होती.
रशियाच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी 23 ऑगस्ट रोजी युक्रेनचा दौरा केला होता. पोलंड येथून ट्रेनने मोदी युक्रेनची राजधानी कीव शहरात पोहोचले होते. राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याबरोबर मोदी युक्रेन नॅशनल म्युझियममध्ये पोहोचले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावेळी मोदी म्हणाले होते, की आता वेळेचा अपव्यय न करता युक्रेनने तत्काळ चर्चेला सुरूवात करावी. तोडगा काढायचा असेल तर तो फक्त चर्चेच्या मार्गातूनच निघू शकतो. त्यामुळे आता याच दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांसमोर अगदी डोळ्यांत डोळे घालून त्यांना सांगितलं होतं की ही वेळ युद्धाची नाही.