Israel Hamas War : इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. युद्धविराम संपल्यानंतर इस्त्रायलने पुन्हा हल्ले (Israel Attack) करण्यास सुरुवात केली आहे. आता इस्त्रायलने दक्षिण गाझात (Gaza City) केलेल्या एका मोठ्या हल्ल्यात तब्बल 45 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण ठार झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये जमिनी पातळीवरील कारवाई सुरू केली आहे. तेव्हापासूचा हा सर्वात वेगाने केलेला हल्ला होता. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इस्त्रायली सैन्याने आता जबलिया, खान युनिस भागात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.
इस्त्रायलने याआधी गाझातील अल शिफा या मोठ्या दवाखान्यावर हल्ला केला होता. येथे हमासचे केंद्र असल्याचा दावा इस्त्रायलने केला होता. या हल्ल्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. मात्र, इस्त्रायलने याचा विचार केला नाही. हल्ले सुरुच ठेवले. मध्यंतरी काही काळ युद्धविराम लागू करण्यात आला होता. युद्धविराम संपताच इस्त्रायलने वेगाने हल्ले सुरू केले आहेत. दक्षिण गाझात तर थेट लोकांच्या घरांवरच हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 45 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हमासच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 हजार 112 मुले आणि 4 हजार 885 महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत सोळा हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. या युद्धाचा अजूनही निकाल लागलेला नाही. कोणत्याही परिस्थितीत हमासचा संपूर्ण बिमोड करायचा या उद्देशाने इस्त्रायल मैदानात उतरला आहे. त्यामुळे हल्ले अजूनही थांबले नाहीत. या युद्धात मात्र महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक फटका बसला आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत. वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.