रोम : इटलीने चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पातून (BRI) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटलीच्या (Italy) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांच्या सरकारने या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण या प्रकल्पातून बाहेर पडणार असल्याची माहिती चीनला कळविली आहे. 2019 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवर सही करणारा इटली हा एकमेव मोठा पाश्चात्य देश ठरला होता. त्यावेळी इटलीच्या या निर्णयावर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी जोरदार टीका केली होती. (Italy has announced its withdrawal from China’s ambitious Belt and Road Initiative project)
बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा महत्त्वाकांक्षी व्यापार आणि पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 2013 मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये अंदाजे $1 ट्रिलियन गुंतवण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पांतर्गत चीनला नवीन आणि प्रगत रेल्वे मार्ग आणि बंदरे बांधून युरोप आणि आशियातील इतर भागांशी जोडले जाणार आहे, परंतु अमेरिकसह अनेक देशांनी सुरुवातीपासूनच बीआरआयचा प्रकल्पाचा पहिल्यापासूनच प्रखर विरोध केला आहे.
या प्रकल्पांतर्गत चीन अनेक देशांना ‘कर्जाच्या जाळ्यात’ अडकवत असून त्यांचा वापर स्वत:च्या हितासाठी करत असल्याचे अमेरिकेचे मत होते. दरम्यान, बीआरआयचा प्रकल्पाचा भाग होणे ही याआधीच्या सरकारची चूक असल्याचे मत मेलोनी यांनी व्यक्त केले होते, तसेच या प्रकल्पातून माघार घेण्याचे संकेतही दिले होते. त्यानुसार आता या प्रकल्पातून इटलीने माघार घेतली आहे. मात्र यानंतरही चीनशी आपल्याला चांगले संबंध ठेवायचे आहेत, आणि यावर सरकार भर देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समितीचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील इतर अनेक नेते पोहोचले होते. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. त्यांच्या भेटीची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली. यावेळी दोघांनी सेल्फी काढला. त्यांनी हा सेल्फी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट देखील केला.