Musk’s wealth increases by $275 billion : जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम रचत एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने इतिहास घडवला आहे. स्पेसएक्सने तब्बल 75 अब्ज डॉलर उभारले असून, यामुळे कंपनी जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानांकडे झेपावली आहे. या आयपीओमुळे एलॉन मस्क यांची संपत्ती देखील प्रचंड वाढली असून ते जगातील पहिले ट्रिलियन डॉलर म्हणजेच एक लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले व्यक्ती ठरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
स्पेसएक्सने 55.56 कोटी शेअर्स प्रत्येकी 135 डॉलर दराने विक्रीसाठी उपलब्ध केले. हा आयपीओ 2019 मध्ये झालेल्या सौदी अरेबियाच्या आर्मकोच्या 29.4 अब्ज डॉलरच्या आयपीओपेक्षा दुपटीहून अधिक मोठा ठरला आहे. याशिवाय अंडररायटर्सना आणखी 8.33 कोटी शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला असून, तो पूर्णपणे वापरण्यात आल्यास या आयपीओचा आकार तब्बल 86 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो.
आयपीओनंतर स्पेसएक्सचे बाजारमूल्य 1.77 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. कर्मचारी स्टॉक ऑप्शन्स आणि इतर भागभांडवलाचा विचार केल्यास कंपनीचे एकूण मूल्य सुमारे 1.8 ट्रिलियन डॉलर इतके मानले जात आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून उपलब्ध शेअर्सच्या चारपट मागणी नोंदवली गेली.
विशेष म्हणजे एलॉन मस्क यांच्या चाहत्यांनी आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी तब्बल 100 अब्ज डॉलरहून अधिक किमतीच्या शेअर्ससाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. मात्र सर्वजण या मूल्यांकनाशी सहमत नाहीत. प्रसिद्ध शॉर्ट सेलर जेम्स चणोस चॅनोस यांनी हा आयपीओ आशा आणि स्वप्नांवर आधारित असल्याची टीका करत कंपनी अजून देखील नफ्यात नसल्याचे नमूद केले आहे.
दुबई-थायलंडमधून चालणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार गणेश काळे भारतात अटक
स्पेसएक्स आता फक्त रॉकेट प्रक्षेपण आणि सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी राहिलेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय क्षेत्रात मोठी झेप घेत कंपनीने स्वतःला भविष्यातील तंत्रज्ञान महासत्ता म्हणून सादर केले आहे. कंपनीच्या एआय पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून दरमहा 2.17 अब्ज डॉलरपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आयपीओकडे वॉल स्ट्रीटसह सिलिकॉन व्हॅलीचे देखील लक्ष लागले आहे. कारण एआय क्षेत्रातील अन्य दिग्गज कंपन्या जसे की अँथ्रोपिक आणि ओपनएआय देखील लवकरच सार्वजनिक सहभाग विक्रीच्या तयारीत असून त्यांचे मूल्यांकन देखील 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असू शकते. दरम्यान, स्पेसएक्सच्या शेअरमुल्यामुळे एलॉन मस्क यांच्या संपत्तीत जवळपास 275 अब्ज डॉलरची भर पडणार आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती सुमारे 970 अब्ज डॉलरवर पोहोचणार असून, शेअर बाजारातील यशस्वी पदार्पण झाल्यास ते जगातील पहिले ट्रिलियन डॉलर संपत्तीचे मालक बानू शकतात.
स्पेसएक्समध्ये एलॉन मस्क यांचे मतदानाचे नियंत्रण 84 टक्क्यांहून अधिक राहणार आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंतचे सर्व महत्वाचे निर्णय प्रभावीपणे त्यांच्या नियंत्रणाखालीच राहतील. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले, बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप आणि जेपी मॉर्गन यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्थांनी या विक्रमी आयपीओचे नेतृत्व केले आहे. स्पेसएक्सचा शेअर SPCX या चिन्हाखाली नॅसडॅक टेक्सासवर सूचिबद्ध होणार आहे. एआय, अवकाश संशोधन आणि भविष्यतील तंत्रज्ञानाच्या प्रचंड अपेक्षांवर उभ्या असलेल्या स्पेसएक्सच्या या आयपीओने जागतिक वित्तीय क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, आता सर्वांचे लक्ष कंपनीच्या शेअरच्या कामगिरीकडे लागले आहे.
