Download App

पाकचे माजी PM इम्रान खान अन् पत्नी बुशरा बीबीला मोठा धक्का; तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा

  • Written By: Last Updated:

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तोशाखान प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह पत्नी बुशरा बिबीला (Bushra Bibi) 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त स्थानिक मीडिया रिपोर्टने दिले आहे. कालच (दि.30) इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Pakistan’s EX PM Imran Khan & His Wife Bushra Bibi Jailed)

शिक्षा सुनावताना न्यायालयाने दोघांनाही 10 वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक पद बहाल करण्यास मनाई केली आहे. याशिवाय न्यायालयाने 78.7 कोटींचा सामूहिक दंडही ठोठावला आहे. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी इम्रान खान यांचा पक्ष निवडणूक चिन्हाशिवाय निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यात इम्रान खान यांचे बहुतांश नेते तुरुंगात आहेत.

इम्रान खानवर नेमके आरोप काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 2018 ते 2022 या कालावधीत पदाचा गैरवापर करून सरकारी भेटवस्तू खरेदी-विक्रीसाठी आपल्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप आहे. या भेटवस्तू इम्रान खान यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान मिळाल्या होत्या. या सर्व वस्तुंची किंमत 140 दशलक्ष रुपये म्हणजेच ($635,000) पेक्षा जास्त होती. यानंतर, ट्रायल कोर्टाने सुनावणी घेतल्यानंतर इम्रान खानला मालमत्ता लपवणे आणि सरकारी भेटवस्तू विकल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र, इम्रान खानच्या वकिलांनी यापूर्वीच ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप केले होते. याप्रकरणात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना अपात्र ठरवले होते. या विरोधात इम्रान खान यांनी याचिका दाखल केली होती. मात्र. ही याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली होती.

follow us