Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात निवडणुकीनंतर गोंधळाचे वातावरण (Pakistan Election Result 2024) कायम आहे. निवडणुकीत फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात (Pakistan Election) खळबळ उडाली आहे. आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाबरोबर रावळपिंडीत निवडणुकीत न्यायपालिका आणि निवडणूक आयोगाच्या इशाऱ्यावरून हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
रावळपिंडीचे माजी आयुक्त लियाकत चठ्ठा यांनी शनिवारी शहरातील निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना विजयी केले गेले असा आरोप केला होता. रावळपिंडीत 13 उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाने 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी आणि पक्षाला दिलेला जनादेश हिसकावून घेण्याच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू केली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Pakistan Elections : आश्चर्यच! जिंकलेल्या उमेदवारांनीच घेतली माघार; पाकिस्तानात चाललंय तरी काय?
पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रावळपिंडीचे माजी आयुक्त म्हणाले, मी या गडबडीची संपूर्ण जबाबदारी घेतो. मुख्य निवडणूक आयुक्त आणि सरन्यायाधीश यांचा यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे. याआधी चठ्ठा यांनी या प्रकाराची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पाकिस्तान निवडणूक आयोगाने मात्र चठ्ठा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
निवडणूक आयोगाने या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. रावळपिंडीचे नवनियुक्त आयुक्त सैफ अन्वर जप्पा यांनी मात्र निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप फेटाळून लावले.
Pakistan Elections : अखेर ठरलं! नवाज शरीफ यांची माघार, शहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे PM
निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत सिंध प्रांतात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडून निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर पीटीआय, जमात ए इस्लामीसह अन्य काही पक्ष दावा करत आहेत की त्यांच्या उमेदवारांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले. त्यामुळे निकाल कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.