Download App

Prague Shooting : धक्कादायक! ‘प्राग’मध्ये अंदाधुंद गोळीबार; हल्लेखोरासह 15 ठार, 30 जखमी

Prague Shooting : अंदाधुंद गोळीबारात अनेक निरपराध नागरिक मारले (Prague Shooting) जाण्याच्या घटना घडत असतात. यातील बहुतांश घटना या अमेरिकेतूनच समोर आल्या आहेत. पण, आता अशीच थरकाप उडविणारी घटना झेक प्रजासत्ताक या देशातून आली आहे. येथील प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 15 लोकांचा मृत्यू झाला. 24 वर्षीय हल्लेखोराने प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार केला. त्याच्या या गोळीबारात जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जा आहे.

या घटनेनंतर चेक पोलिसांनी माहिती देताना सांगितले की राजधानी प्रागमध्ये झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेतील हल्लेखोरही मारला गेला आहे. यापेक्षा आधिक माहिती देण्यास सध्या पोलिसांनी नकार दिला आहे. जान पलाच स्क्वायरमधील एका विद्यापीठात गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर झेक प्रजासत्ताक सरकारने उद्या (23 डिसेंबर) एक दिवसाचा शोक जाहीर केला आहे.

अमेरिकेत गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

प्रागचे महापौर बोहुस्लाव स्वोबोडा यांनी सांगितले की जान पलाच स्क्वायर येथील चार्ल्स विद्यापीठातील दर्शनशास्त्र विभाग रिकामा करण्यात आला आहे. हा सगळाच परिसर सील करण्यात आला आहे. मंत्री विट राकुसन म्हणाले, घटनास्थळी अन्य दुसरा कुणी हल्लेखोर उपस्थित नव्हता. प्रागच्या बचाव पथकाने सांगितले की या घटनेत आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 लोक जखमी झाले आहेत. या जखमींपैकी 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही घटना ओल्ड टाउनजीक असणाऱ्या चार्ल्स विद्यापीठाच्या आर्ट्स विभागात घडली. पोलीस प्रमुख मार्टिन वोंद्रसेक म्हणाले, गोळीबार करणारा 24 वर्षांचा होता. विशेष म्हणजे, तो याच विद्यापीठातील विद्यार्थी होता. हा विद्यार्थी कोण याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या गोळीबाराचा नेमका उद्देश काय होता याची माहिती घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

Tags

follow us