Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी जेव्हा नवलनी तुरुंगात फिरत होते तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि ते बेशुद्ध झाले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तातडीने बोलवण्यात आले. पण ते शुद्धीवर आले नाहीत. नवलनीचा मृत्यू कशामुळे झाला? सध्या त्याची नेमकी माहिती समोर आली नाही.
यापूर्वी, नवलनीबद्दल अफवा पसरली होती की 2020 मध्ये सायबेरियामध्ये त्यांना विष देऊन ठार मारण्यात आले होते. मात्र, रशियन सरकारने हे विधान निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. त्यांना नर्व्ह एजंटने विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सरकारकडून निवेदनात म्हटले होते. एवढेच नाही तर तुरुंगातून ते बेपत्ता झाल्याची अफवाही पसरली होती.
Jailed Russian opposition leader Alexei Navalny is dead, reports Reuters citing the prison service of the Yamalo-Nenets region where he had been serving his sentence.
— ANI (@ANI) February 16, 2024
गेल्या वर्षी नवलनीची शिक्षा 19 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले केले होते की, मी घाबरत नाही तुम्हीच घाबरला आहात. विरोध करण्याची इच्छाशक्ती गमावत आहात. विरोध करण्याची तुमची इच्छाशक्ती गमावू नका. 19 वर्ष या आकड्याला काही अर्थ नाही. मला पूर्णपणे समजले आहे की, अनेक राजकीय कैद्यांप्रमाणेच माझी शिक्षा जन्मठेपेची आहे. पॅरोलचे उल्लंघन, फसवणूक आणि न्यायालयाचा अवमान अशा अनेक प्रकरणांमध्ये नवलनी आरोपी होते.
राजकोटमध्ये अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा 9वा गोलंदाज
नवलनी पुतिन यांचे कट्टर विरोधक होते
नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. 2011 मध्ये त्यांनी पुतिन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकण्यात आले. 2013 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले.