3 Years Of Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्धाला आता तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी (24 फेब्रुवारी 2025) या विनाशक युद्धाला तीन वर्षे पूर्ण (Russia Ukraine War) झाली. आजच्याच दिवशी व्लादिमिर पुतीनच्या सैन्याने (Vladimir Putin) मोठा हल्ला करत युक्रेन विरुद्ध युद्धाला तोंड फोडले होते. या युद्धाला पुतिन यांनी एक सैन्य ऑपरेशन असे म्हटले होते. फक्त 72 तासांत संपूर्ण युक्रेनवर कब्जा करू असेही पुतीन यांनी यावेळी सांगितले होते. पण आता युद्ध सुरू होऊन तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे तरी ना रशिया विजयी झाला ना युक्रेनचा पराभव (Ukraine Crisis) झाला. या युद्धात पश्चिमी देशांकडून युक्रेनला सातत्याने पाठबळ मिळत आहे. त्यामुळे रशियाला अजूनही युक्रेनचा पाडाव करता आलेला नाही.
तीन वर्षांनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे की या युद्धात युक्रेनने काय (Ukraine War) गमावलं आणि या रक्तरंजित युद्धात रशियाने काय मिळवलं? या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले इतके मात्र नक्की आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनला जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त (Ukraine Economy) तडाखे बसले आहेत.
तीन वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाले तेव्हा रशियाची अर्थव्यवस्था 1.3 टक्क्यांपर्यंत घसरली होती. आता मात्र यात सुधारणा होऊन हा आकडा 3.6 पर्यंत पोहोचला आहे. परंतु तरीही रशियाची आर्थिक (Russian Economy) परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. अनेक क्षेत्रात विक्री वाढलेली नाही. महागाईने रेकॉर्ड मोडले आहे आणि व्याजदरही कमालीचे वाढले आहेत.
युक्रेनचा विचार केला तर 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्था 36 टक्क्यांपर्यंत घसरली होती. परंतु 2023 येईपर्यंत युक्रेन आपली आर्थिक गती 5.3 टक्क्यांपर्यंत पोहोचवली. परंतु अनेक क्षेत्रांवर युद्धाचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात युक्रेनचा जीडीपी 2.7 टक्क्यांनी कमी होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Russia Ukraine War : बायडन ते डोनाल्ड ट्रम्प.. युक्रेनला मित्रांनीच दिला दगा
ज्या उद्देशाने रशियाने या युद्धाला सुरुवात केली होती तो उद्देश अजूनही साध्य झालेला नाही. युक्रेनच्या 18 टक्के जमिनीवर आता रशियाचा ताबा आहे. प्रथमदर्शनी पाहिल तर रशियाची ही मोठी सफलता म्हणावी लागेल. पण पूर्ण तीन वर्षांचे युद्ध पाहिले तर एकावेळी रशियाकडे यापेक्षा खूप जास्त जमीन होती. म्हणजेच युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाला बॅकफूटवर ढकलले.
इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरनुसार एकवेळी युक्रेनच्या 54 टक्के जमिनीवर रशियाचा कब्जा झाला होता. परंतु नंतर खेरसॉन, खारकीव यांसारख्या भागांवर युक्रेनच्या सैन्याने पुन्हा आपले आधिपत्य स्थापित केले. त्यामुळे 54 टक्क्यांचा आकडा 18 टक्क्यांपर्यंत कमी झाला. युक्रेनने आपली गमावलेली जमीन पुन्हा मिळवलीच शिवाय रशियाच्या काही भूभागावर कब्जा केला. रशियासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे.
मागील वर्षातील ऑगस्ट महिना पुतिन यांच्यासाठी अतिशय त्रासदायक ठरला. त्यावेळी एका अनपेक्षित हल्ल्यात युक्रेनने रशियाच्या Kursk भागावर आक्रमण केले होते. युक्रेनी सेना पूर्ण 10 किलोमीटर पर्यंत रशियाच्या जमिनीवर दाखल झाली होती. जवळपास 250 चौरस किलोमीटर जमिनीवर युक्रेनने ताबा मिळवला.
दोन्ही देशांतील युद्ध अजूनही सुरूच आहे. पुतीन यांच्या सैन्याने मोठ्या प्रयासाने Donetsk, Luhansk, Zaporizhia आणि खेरसॉन प्रांतांवर ताबा कायम ठेवला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या काही जमिनीवर कब्जा केला आहे. परंतु यासाठी या देशांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. या युद्धात आतापर्यंत 2 लाख 36 हजार रहिवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार कितीही माहिती लपवण्यात आली असली तरी या युद्धात रशियाच्या 95 हजार सैनिकांचा मृत्यू झाला असे म्हणता येईल. तसेच युक्रेनचेही 45 हजारांपेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. तसेच 12 हजार 654 लोकांचा मृत्यू झाला आहे.
या युद्धाने युक्रेनवर आणखी एक मोठा आघात केला आहे. युद्धात शेकडो युक्रेनी नागरिक मारले गेले आहेतच शिवाय त्यापेक्षा जास्त निर्वासित झाले आहेत. UN High Commissioner for Refugees च्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर 2024 मध्ये एकट्या युक्रेन मधून 3.7 मिलियन लोक आपल्याच देशातून विस्थापित झाले आहेत. म्हणजेच या लोकांना आपले घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी निर्वासिता सारखे जगणे भाग पडले आहे. 6.9 मिलियन लोकांनी तर आता दुसऱ्या देशांत आश्रय मागितला आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा 5.7 मिलियन लोकांनी युक्रेन सोडला होता.
भारतातील नऊ शहरे सर्वात स्वस्त, महागड्या शहरांत पहिलं कोण?, वाचा अहवाल
आजमितीस 6.3 मिलियन युक्रेनी लोक युरोपातील विविध देशांत राहत आहेत. यातील 1.2 मिलियन लोक जर्मनीत, 1 मिलियन पोलंडमध्ये राहत आहेत. परंतु आत स्थिती अधिक खराब होण्याची शक्यता दिसू लागली आहे. आतापर्यंत अमेरिकेकडून सर्वाधिक मदत युक्रेनला मिळत होती. त्यामुळे तीन वर्षे युक्रेन युद्धात टिकून राहिला. आता मात्र अमेरिकेतील सत्तेत बदल झाला आहे. राष्ट्रपती होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेकडून मिळणारा पैसा बंद झाला आहे. यातच ट्रम्प झेलेन्स्की यांच्याऐवजी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडे जास्त झुकलेले दिसू लागले आहेत. या युद्धात अमेरिकेने युक्रेनला 47 टक्के, जर्मनी 8 टक्के, नेदरलँड 4 टक्के, स्वीडन 3 टक्के, फ्रान्स 3 टक्के, इटली 1 टक्का, डेन्मार्क 4 टक्के आणि पोलंडने 2 टक्के मदत केली आहे.
आता युद्धात मिळत असलेली अमेरिकेची मदत काढून घेतली तर युक्रेनला युद्धात टिकून राहणे अत्यंत कठीण होणार आहे. यातच ट्रम्प पूर्णपणे पुतिन यांचे समर्थन करताना दिसत आहे. कोणता विचार करून युक्रेनने युद्ध सुरू केले होते? असा सवाल ट्रम्प करत आहेत. आपली गमावलेली जमीन परत मिळेल याचा विचार युक्रेनने सोडून दिला पाहिजे असे देखील ट्रम्प म्हणत आहेत. नाटो संघटनेत सहभागी होण्याचा विचारही युक्रेनने सोडून दिला पाहिजे. सऊदी अरब मध्ये सुरू झालेल्या शांतता परिषदेसाठी युकेनला साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही. अशी परिस्थिती असताना युद्ध कोणत्या अटींनी समाप्त होईल? कधी होईल? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी कुणाकडेच नाही.