जगभरात इंधन संकटाची चिंता, पण भारतासाठी इराणचा मोठा निर्णय, होर्मुझचे दरवाजे चार देशांसाठी खुले

इराणकडून भारतासह चीन,इराक आणि कतार या चार देशांना या सागरी मार्गातून जहाजांची ये-जा करण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Untitled Design   2026 11 04T181806.089

Untitled Design 2026 11 04T181806.089

Strait of Hormuz remains open for four countries, including India : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठं संकट निर्माण झालं आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम आता होर्मूझच्या समुद्रधुनीवर दिसून येत असून, या महत्वाच्या सागरी मार्गातून जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इराणने भारताला होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक करण्यासाठी विशेष सवलत दिल्याचा दावा केला आहे.

इराणकडून भारतासह चीन,इराक आणि कतार या चार देशांना या सागरी मार्गातून जहाजांची ये-जा करण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. या सवलतींमुळे भारतीय व्यापारी जहाजांना होर्मूझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

या निर्णयाची माहिती इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपाध्यक्ष अमीर हयात मोगद्दाम यांनी मंगळवारी दिली. भारतासह चार देशांच्या जहाजांना होर्मूझमधून प्रवास करण्यासाठी निर्बंधांतून सूट देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताला ही सवलत देण्यामागे औषधांची आयात करता यावी, हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. तर चीनला राजनैतिक पाठिंबा आणि आर्थिक देवाणघेवाणीसाठी ही सवलत देण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, या सवलतीचा अर्थ जहाजांना पूर्णपणे विनाशुल्क प्रवास करता येणार असा नाही. भारतीय आणि चिनी जहाजांकडून प्रवास शुल्क आकारलं जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांपासून वाहनधारकांपर्यंत सर्वांसाठी मोठ्या घोषणा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

दरम्यान, भारतासाठी ही दिलासादायक बातमी असतानाच अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. अमेरिकेने होर्मूझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या काश्म बेटावर मर्यादित हल्ले केल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर इराणच्या काश्म आणि हेंगम बेटांसह बंदर अब्बास परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं इराणी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता असून, होर्मूझमधील जहाज वाहतूक आणि जागतिक इंधन पुरवठ्यावर त्याचे काय परिमाण होतात, याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी होर्मूझच्या सागरी मार्ग खुला राहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पश्चिम आशियातील देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिल्यास तेल आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्यास या सवलतीचा आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयानंतर भारताची पुढील भूमिका काय असणार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे कोणते पडसाद उमटणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version