Download App

चीनची अंतराळातही डोकेदुखी! रॉकेटच्या कचऱ्याने सॅटेलाइट्स अन् स्पेस स्टेशन धोक्यात..

चीनने तब्बल १८ सॅटेलाइट (China News) अंतराळात सोडले. यामुळे अवकाशात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे.

China News : चीनच्या कारनाम्यांनी सगळं जगच हैराण झालं आहे. जगाला संकटात टाकणारं काम चिनी लोक कधी करतील याचा काहीच नेम नाही. आता फक्त पृथ्वीच नाही तर अवकाशातही असेच डोकेदुखीचे उद्योग चीनने सुरू केले आहेत. चीनने अंतराळात असा एक कारनामा केला आहे ज्यामुळे अनेक देशांचं टेन्शन वाढलं आहे. चीनने नुकतंच एक रॉकेट अवकाशात सोडलं होतं. या रॉकेटद्वारे एक नाही दोन नाही तर तब्बल १८ सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यात आले. सॅटेलाइट्स त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचले असतीलही पण या रॉकेटच्या कचऱ्याने अन्य देशांच्या सॅटेलाइट्स आणि स्पेस स्टेशन्सना मात्र धोका निर्माण झाला आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं चला तर मग जाणून घेऊ या कसं ते.. 

खरं तर चीनने एलन मस्कला (Elon Musk) टक्कर देण्यासाठी तब्बल १८ सॅटेलाइट (China News) अंतराळात सोडले. यामुळे अवकाशात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. हा कचरा लाँग मार्च 6 ए रॉकेटच्या वरील भागाचा आहे. हा भाग अवकाशात तुटून पडला होता. आता या कचऱ्यामुळे जगभरातील सॅटॅलाइट्स आणि स्पेस स्टेशन्सना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..

चीनने 6 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या लाँग मार्च 6 ए या रॉकेटमधून तब्बल 18 सॅटेलाइट्स अवकाशात सोडले होते. आता इतक्या मोठ्या संख्येने सॅटॅलाइट्स अवकाशात सोडण्याचे काय कारण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागे कारण अवकाशात काही नवीन माहिती मिळवण्याचं अजिबात नाही. तर एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाइट्सना टक्कर देणे हे आहे. चीनचं हे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याचं उत्तर आताच देणं शक्य नाही. मात्र चीनच्या या कारनाम्याने अनेकांची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढली आहे.

चीनच्या या प्रोजेक्टमध्ये थोडी गडबड झाली आहे. लाँग मार्च 6 ए रॉकेटचा काही भाग तुटला. रॉकेटचे तुटलेले भाग अवकाशात पसरले आहेत. जवळपास 300 तुकडे अंतराळात पसरले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सगळे तुकडे पृथ्वीच्या खालील कक्षेत (Lower Earth Orbit) पसरले आहेत. या कचऱ्यामुळे विविध देशांच्या सॅटॅलाइट्स आणि स्पेस स्टेशन्सना कधीही धोका निर्माण होऊ शकते. रॉकेटचे हे तुकडे कोणत्याही क्षणी सॅटेलाइटना धडकू शकतात.

या घडामोडींवर अमेरिकी स्पेस कमांड यावर बारकाईने नजर ठेऊन आहे. चीनने लाँग मार्च 6 ए रॉकेटद्वारे 18 फ्लॅट पॅनल कियानफेन किंवा जी 6 ला अवकाशात सोडले होते. शांघाय स्पेसकॉम सेटेलाईट टेक्नॉलॉजीसाठी 800 किलोमीटर उंचावर पोलार ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट स्थापित करायचे होते. पण या मिशनने चीनने जगभरातील सेटेलाइट्सना संकटात टाकलं आहे.

छोटा भाऊ होणार की वादाचा नवा अंक सुरू करणार? चीन मित्र ‘ओलीं’च्या हाती नेपाळचं पॉलिटिक्स

कचरा फिरतोय सुसाट

अवकाशातील रॉकेटचे तुकडे एकत्रितपणे एकाच दिशेत तरंगत आहेत. यातील 50 तुकडे अतिशय धोकादायक ऑर्बिटमध्ये आहेत. जिथून हे तुकडे कोणत्याही क्षणी दुसऱ्या देशांच्या सेटेलाइट्स आणि स्पेस स्टेशन्सना धडकू शकतात. हा कचरा साडेसात किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. रॉकेटचे अपर स्टेज तुटल्याने हा कचरा तयार झाला आहे. रॉकेटचा हा भाग प्रोपेलंटशिवाय 5 हजार 800 किलोग्राम वजनाचा असतो.

अमेरिकी स्पेस फोर्सने सांगितले की चीनच्या लाँग मार्च 6 ए रॉकेटचा वरचा भाग तुटून पडल्याने हा कचरा तयार झाला आहे. या कचऱ्यामुळे कोणत्याही मानवी उड्डाणाला काहीही अडचण निर्माण होणार नाही असे सांगितले जात आहे. याआधी नोव्हेंबर 2022 मध्येही लाँग मार्च 6 ए रॉकेटचा वरील भाग तुटला होता. ज्यामुळे अवकाशात शेकडो तुकडे पसरले होते.

follow us