भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..

भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..

Giorgia Meloni China Visit : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. हा दौरा अशा वेळी झाला जेव्हा चीन आणि भारतातील संबंधात तणाव वाढला आहे. चीनच्या (China) अनेक प्रकल्पांना भारताने विरोध दर्शविला आहे. इटली आणि भारताचे (India Italy Relation) संबंध अनेक वर्षांपासून चांगले राहिले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा (Giorgia Meloni) भारताबाबतचा दृष्टिकोनही चांगलाच राहिला आहे. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आले आहे. दोन्ही देश अनेक मुद्द्यांवर एकत्र आलेले दिसले आहेत.

अशी परिस्थिती असताना मेलोनी यांनी चीन दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याकडे भारतासह जगभरातील देशांच्या नजरा होत्या. कारण इटली आधी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशियटिव्ह प्रोजेक्टचा भाग होता. पण अमेरिका आणि युरोपियन युनियनने काळजी व्यक्त केल्यानंतर मागील वर्षी इटली या प्रोजेक्टमधून बाहेर पडला. हा निर्णय मेलोनी पंतप्रधान असतानाच झाला होता.

इटली भारताचा चांगला मित्र असण्याबरोबरच जी 7 ग्रुपचा घटक आहे. विशेष म्हणजे या संघटनेतील सर्वच देशांचे चीन बरोबरील संबंध चांगले नाहीत. मेलोनी यांच्या दौऱ्याचा काल शेवटचा दिवस होता. याआधी मेलोनी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी इटली आणि चीन (Italy China) यांच्यातील संबंध पुन्हा सुधारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सदस्य नाही तरीही भारताचा दबदबा; G7 देशांना का वाटतंय भारताचं महत्व?

याआधी रविवारी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी जॉइंट इटली चीन वर्क प्लॅनवर स्वाक्षरी केली. दोन्ही बाजूंनी संबंध संतुलित असले पाहिजेत यावर या प्लॅनचा भर राहणार आहे. चीनने ही यावेळी समान सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. आजमितीस चीनच्या अनेक कंपन्या इटलीत काम करत आहेत. परंतु मागील काही वर्षांत इटलीने आपल्या धोरणात बदल केल्याने या कंपन्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

मेलोनी यांनी सांगितले की वर्क प्लॅनचा उद्देश मागील करार पुन्हा लागू करणे आणि सहकार्याच्या नवीन संधी शोधणे आहे. मागील करारामध्ये बीआरआयचा (Belt and Road Initiative) समावेश आहे. ज्यावर भारताने आधीच चिंता व्यक्त केली आहे. कारण या प्रकल्पाचा एक हिस्सा पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या काश्मीरातून (POK) जातो. पाकव्याप्त काश्मीरवर भारतदेखील आपला हक्क सांगत आलेला आहे. या प्रकल्पाच्या संबंधित बैठकांमध्ये भारताने कधीच सहभाग घेतलेला नाही.

जपानची राजधानी टोकियो (Tokyo) शहरात नुकतीच क्वाड देशांची बैठक झाली. या बैठकीत चीनला कठोर संदेश देण्यात आला की कोणताही देश दुसऱ्या देशावर आपला प्रभाव गाजवू शकत नाही. भारत क्वाड संघटनेचा सदस्य देश आहे. याच बैठकीत विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि चीनमधील (India China Relation) संबंध चांगले नसल्याचे सांगितले. याचे कारण देखील चीनच आहे असे त्यांनी ठासून सांगितले. चीनने आपसी सहमतीचे उल्लंघन केले. आम्ही आमचे मुद्दे सोडवण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या देशाकडे पाहत नाहीत असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले होते.

China : चीनचा नवा जीएसआय उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा

आता असे असले तरी चीनच्या विस्तारवादी धोरणांची भारताला चिंता आहेच. बीआरआय प्रोजेक्ट सुद्धा याच धोरणाचा एक भाग आहे आणि भारत या प्रकल्पाच्या ठाम विरोधात आहे. अशा परिस्थितीत आता चीनशी संबंध सुधारण्यासाठी निघालेला इटली पुन्हा या प्रोजेक्टचा भाग होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube