युद्धविराम असूनही अमेरिका-इराणमध्ये तणाव कायम; ड्रोन आणि बोटी उद्ध्वस्त केल्याचा ट्रम्प यांचा दावा

होर्मूझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चकमक झाल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Untitled Design 92

Untitled Design 92

Tensions continue between the US and Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर पन्हे एकदा अनिश्चिततेचे सावट गडद झाले आहे. मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक संवेदनशील बनत असताना, त्याचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजार, कच्च्या तेलाच्या किंमती आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. शुक्रवारी आशिया-पॅसिफिकमधील बहुतांश प्रमुख शेअर बाजार घसरणीसह व्यवहार जातात होते. होर्मूझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चकमक झाल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या चकमकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. अमेरिकेने दावा केला की इराणने प्रथम ड्रोन आणि लहान नौकांच्या मदतीने आक्रमक हालचाली केल्या, तर इराणने अमेरिकेवरच संघर्ष भडकावल्याचा आरोप केला. या तणावामुळे काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला युद्धविराम धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम अद्याप कायम असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या कारवाईला फक्त एक छोटासा इशारा असल्याचं सांगितलं आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला.

यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमुळे वातावरण आणखी तापले. त्यांनी अमेरिकेने इराणी ड्रोन आणि लहान बोटी पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला. ते समुद्रात अगदी फुलपाखरासारखे कोसळले, असे वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केले. याचबरोबर त्यांनी इराणला आण्विक करारावर त्वरित स्वाक्षरी करण्याचा इशारा दिला. आज जसे आम्ही प्रत्युत्तर दिले, त्यापेक्षा अधिक कठोर आणि हिंसक कारवाई भविष्यात केली जाईल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिल्याने मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नारेगावातील फ्लॅटवर पोलिसांचा छापा; TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक

विशेष म्हणजे, होर्मूझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मनाली जाते. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्यात याच मार्गाने होते. त्यामुळे या भागातील कोणतीही लष्करी हालचाल किंवा संघर्ष जागतिक तेलबाजारासाठी धोक्याची घंटा मानली जाते. संघर्षाची बातमी समोर आल्यानंतर सुरूवातीला कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये जोरदार वाढ झाली. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट अर्थात WTI क्रूडचे जून वायदे व्यवहार प्रतिबॅरल 95 डॉलरच्या पुढे गेले, तर ब्रेंट क्रूडने १०१ डॉलरचा टप्पा ओलांडला. मात्र नंतर बाजारात काहीशी स्थिरता आल्याने किंमतीमध्ये मर्यादित माघार पाहायला मिळाली.

जागतिक तणावाचा सर्वाधिक परिणाम शेअर बाजारांवर झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरला, तर जपानच्या निक्केई 225 निर्देशांकातही नफावसुलीमुळे घसरण झाली. गुरुवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक घसरला. चीनचा CSI300 आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही लाल निशाणीत व्यवहार करत होते.

अमेरिकन फ्युचर्स बाजारातही अनिश्चिततेचे वातावरण दिसून आले. एस अँड पी 500, नॅस्डॅक-100 आणि डाऊ जोन्स फ्युचर्समध्ये घसरण झाली. विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवर दबाव वाढल्याचे दिसले. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण झाली होती. एस अँड पी 500 निर्देशांक 0.38 टक्क्यांनी घसरला. ॲमेझॉन, ब्रॉडकॉम आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजी यांसारख्या तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याने बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण संघर्ष आणखी वाढल्यास त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक पुरवठा साखळी, व्यापार आणि गुंतवणूक यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि अमेरिका-इराण यांच्यातील घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

 

Exit mobile version