Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?

American Pilot In Iran इराण आणि अमेरिका संघर्षात अमेरिकन पायलट इराणच्या हद्दीत अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?

Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?

American Pilot Shot Down In Iran what Next : इराणने अमेरिकेचे F-5E लढाऊ विमान पाडल्याच्या आणि त्यातील वैमानिक इराणच्या हद्दीत असल्याच्या बातमीने परिस्थिती आणखी चिघळली आहे. या वैमानिकाला जो कुणी पकडून आमच्या हवाली करेल त्याला बक्षीस दिले जाईल अशी घोषणा केली आहे. पण, आता मोठा प्रश्न असा आहे की, जर एखादा वैमानिक शत्रू देशात पकडला गेला, तर त्याला सोडले जाते की शिक्षा दिली जाते? याचे उत्तर आंतरराष्ट्रीय कायद्यात, विशेषतः जिनिव्हा करारात आणि प्रत्यक्ष जमिनीवरील राजकारणात दडलेले आहे.त्याबद्दल समजून घेऊया…

युद्धकैद्याचा दर्जा: पायलट युद्धकैदी असतो, POWनाही

जर, एखाद्या देशाचा लष्करी वैमानिक शत्रूच्या भूमीवर पकडला गेला, तर त्याला सामान्य कैदी न मानता युद्धकैदी (POW) मानले जाते. जिनिव्हा करार (1949) स्पष्ट करतो की, युद्धात पकडलेल्या सैनिकांना कायदेशीर संरक्षण दिले जाते. याचा अर्थ असा की, जर एखादा अमेरिकन वैमानिक इराणच्या हाती लागला, तर त्याला गुन्हेगार किंवा गुप्तहेर म्हणून नव्हे, तर युद्धकैदी म्हणून वागणूक दिली जाईल.

जिनिव्हा कराराचे नियम, काय करता येते, काय नाही

जिनिव्हा करारानुसार, युद्धकैद्यांना माणुसकीने आणि सन्मानाने वागवणे गरजेचे असते. वैमानिकाला मारहाण, छळ किंवा त्याचा सार्वजनिक अपमान करता येत नाही. तसेच वैमानिकाला केवळ त्याची मूलभूत ओळख म्हणजेच नाव, पद आणि सर्व्हिस क्रमांक सांगण्यास भाग पाडले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, पकडलेल्या वैमानिकाला सुरक्षित ठिकाणी ठेवणे, वैद्यकीय सेवा आणि पुरेसे अन्न पुरवणे आवश्यक असते. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ शत्रू देशाचा सैनिक असल्यामुळे त्याला शिक्षा होऊ शकत नाही. युद्धगुन्ह्याचा दोषी सिद्ध झाल्यावरच, आणि तेही निष्पक्ष सुनावणीनंतरच संबंधित सैनिकाला शिक्षा शक्य असते.

इराणला अमेरिकेच्या त्या पायलटला सोडावे लागेल?

इराणच्या हद्दीत अडकलेल्या त्या वैमानिकाला तात्काळ सोडण्याचे बंधन नाही. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, कोणत्याही युद्धकैद्याला युद्ध संपेपर्यंत ताब्यात ठेवता येते. सहसा, युद्धविराम किंवा शांतता करार झाल्यानंतरच त्याची सुटका होते. मात्र, जर वैमानिक गंभीर जखमी असेल, तर माणुसकीच्या कारणास्तव त्याला लवकर सोडले जाऊ शकते. कायदेशीररित्या, इराण त्याला अधिक कालावधीसाठी ताब्यात ठेवू शकतो, परंतु त्याच्याशी गैरवर्तन करू शकत नाही.

नियम विरुद्ध वास्तव: खऱ्या जगात काय घडते?

आंतरराष्ट्रीय कायद्यातील नियम कागदावर स्पष्ट आहेत, पण जमिनीवरील वास्तव अनेकदा वेगळे असते. अनेकदा अनेक देशांनी दबाव किंवा प्रचाराच्या उद्देशाने युद्धकैद्यांचा वापर केला आहे. ज्यात युद्धकैद्यांना दूरचित्रवाणीवर दाखवणे, त्यांना जबाब देण्यास भाग पाडणे, किंवा त्यांना गुप्तहेर ठरवून त्यांच्यावर वेगवेगळे कायदे लागू करणे. अशी उदाहरणे यापूर्वीही दिसून आली आहेत. इराणने जाहीर केलेले ‘बक्षीस’ हे देखील याच राजकीय आणि मानसिक दबावाच्या रणनीतीचा एक भाग मानले जात आहे.

अमेरिकेकडे आता कोणते पर्याय?

इराणच्या हद्दीत विमान कोसळून अडकलेल्या अमेरिकन वैमानिकाला जर इराणने पकडले, तर अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत. यात पहिला पर्याय म्हणजे ते विशेष दलांच्या साहाय्याने सुटका मोहीम राबवण्याचा प्रयत्न करू शकतात, जरी हे अत्यंत जोखमीचे असले तरी. दुसरा पर्याय म्हणजे अमेरिका संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या माध्यमातून राजकीय दबाव आणू शकते आणि तिसरा आणि सर्वात सामान्य पर्याय म्हणजे कैद्यांची अदलाबदल. याचा अर्थ असा की, अमेरिका इराणच्या ताब्यात असलेल्या एका अमेरिकन वैमानिकाच्या बदल्यात इराणमधील इराणी कैद्यांची अदलाबदल करू शकते. अशी प्रकरणे कधीकधी मोठ्या राजकीय करारांचा भाग असतात.

वैमानिकाला सोडवण्यासाठी अमेरिका सध्या काय करतीये?

सध्या, अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या वैमानिकाला वाचवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अमेरिकन हवाई दलाने इराणी हवाई क्षेत्रात दोन हेलिकॉप्टर पाठवले आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय कायदा स्पष्टपणे सांगत असला तरी, शत्रू देशात पकडलेला वैमानिक हा युद्धकैदी असतो आणि त्याला शिक्षा केली जाऊ शकत नाही. पण, वास्तविक जगात, पडकलेल्या सैनिकाचे किंवा वैमानिकाचे भवितव्य केवळ कायद्याने ठरत नाही तर, यासाठी तत्कालीन राजकारण, लष्करी सामर्थ्य आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे आता इराण-अमेरिका संघर्षात अडकलेला अमेरिकेचा वैमानिक केवळ एक सैनिकच नव्हे, तर राजकीय खेळातील एक महत्त्वाचा प्यादा देखील बनू शकतो.

Exit mobile version