Donald Trump News : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प अॅक्शन (Donald Trump) मोडमध्ये आले. त्यांनी एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली. काही निर्णयांचे जनतेने स्वागत केले तर काही निर्णय मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशातच ट्रम्प यांनी आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय लवकर अंमलात आला तर कदाचित तीन वर्षांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेन यांच्यातील (Russia Ukraine War) युद्ध थांबू शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा युक्रेनला मोठा झटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती
याआधी जो बायडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेकडून युक्रेनला भरघोस मदत दिली जात होती. यामध्ये अब्जावधी डॉलर्सच्या हत्यारांचा समावेश होता. या मदतीमुळेच युद्ध लांबलं. रशियाला युक्रेनचा पाडाव करता आला नाही. परंतु, आता राजकारण बदलू लागलं आहे. अमेरिकेची मदत बंद झाली तर युक्रेनला युद्धाच्या मैदानात फार काळ तग धरता येणार नाही, असे सांगितले जात आहे.
अमेरिकेने फक्त युक्रेनचीच मदत रोखण्याचा निर्णय घेतला असे नाही तर जितक्या देशांना मदत दिली जात होती ती सर्व बंद करण्यात येणार आहे. यामध्ये इस्त्रायल, इजिप्त या दोन देशांना मात्र वगळण्यात आलं आहे. या दोन देशांना अमेरिकी मदत मिळत राहिल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट (America First) या धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये विदेशात दिल्या जाणाऱ्या मदतीला कठोर निर्बंध घालण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विकासकामांपासून लष्करी मदतीतही अडचणी निर्माण होणार आहेत. बायडन यांच्या कार्यकाळात युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची मदत दिली जात होती. या मदतीच्या जोरावरच इतके दिवस युक्रेन रशियाला टक्कर देऊ शकला. अमेरिकेने सन 2023 मध्ये युक्रेनला 64 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची मदत दिली होती. मागील वर्षात किती मदत देण्यात आली याची माहिती अजून समोर आलेली नाही.
ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेले रिफ्यूजी प्रोगाम रद्द केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानात अडकलेल्या अफगाणी लोकांना थेट अमेरिकेत सेटल करण्याचे धोरण होते. बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला आश्वासित केले होते की थोड्याच कालावधीत सर्व अफगाण निर्वासितांना अमेरिकेत शरण देण्यात येईल. परंतु, बायडेन सत्तेत असेपर्यंत त्यांना असे करणे शक्य झाले नाही. तालिबान्यांनी सत्तापालट करून अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर हे अफगाणी लोक पाकिस्तानात आले होते.