Download App

ट्रम्प यांचा एक निर्णय! पाकिस्तान फसला, अफगाणी अडकले; नेमकं काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेले रिफ्यूजी प्रोगाम रद्द केले आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच अमेरिकेत ट्रम्प शासन सुरू झालं आहे. राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांनी काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. यात एक निर्णय असा होता ज्याचा सर्वाधिक त्रास पाकिस्तानला होणार आहे. ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेले रिफ्यूजी प्रोगाम रद्द केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानात अडकलेल्या अफगाणी लोकांना थेट अमेरिकेत सेटल करण्याचे धोरण होते. बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला आश्वासित केले होते की थोड्याच कालावधीत सर्व अफगाण निर्वासितांना अमेरिकेत शरण देण्यात येईल. परंतु, बायडेन सत्तेत असेपर्यंत त्यांना असे करणे शक्य झाले नाही. तालिबान्यांनी सत्तापालट करून अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर हे अफगाणी लोक पाकिस्तानात आले होते.

पाकिस्तानात आलेल्या अफगाण नागरिकांत बहुतेकांनी अमेरिकी सैन्यासाठी काम केले होते. या लोकांना काही काळ पाकिस्तानात आश्रय द्यावा त्यानंतर आम्ही या लोकांना अमेरिकेत शिफ्ट करू असे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले होते. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनीही होकार दिला होता. परंतु, बायडेन सत्तेत असताना ही प्रक्रिया काही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आपली फसगत झाल्याची भावना पाकिस्तानी राज्यकर्त्यांत झाली आहे. आता या अफगाणी लोकांचे करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा

पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या या अफगाण शरणार्थींची संख्या 25 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच सगळेच चित्र पलटवून टाकले आहे. पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. पण तरीही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. कारण ट्रम्प यांच्या या निर्णयावर काही प्रतिक्रिया दिली तरी सुरुवातीलाच दोन्ही देशांतील संबंध खराब होतील अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे.

अमेरिकी सरकारमधील एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की जवळपास 1600 अफगाण शरणार्थींना अमेरिकेत वसवण्यासाठी मंजुरी दिली आहे. परंतु, यानंतर ट्रम्प यांनी हे धोरणच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या लोकांना विमानांचे तिकीट रद्द करावे लागले आहेत. अफगाणिस्तानात परत जाता येणार नाही. कारण या लोकांना अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तान सरकारसाठी काम केले होते. परत मायदेशात गेलं तर तालिबान सरकार त्यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशी भीती त्यांना वाटत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात पाकिस्तान सरकारने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेनेही कोणतेच निवेदन दिलेले नाही. परंतु, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या अडचणी मात्र अनेक पटींनी वाढल्या आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्याने स्थानिक वृत्तपत्र द ट्रिब्यूनला सांगितले की जर डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर अशाच पद्धतीचे काहीतरी होईल याचा अंदाज आम्हाला होताच. परंतु, अमेरिकी सरकारने ज्या पद्धतीने हे सगळं केलं ते पाहून आम्ही हैराण झालो आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला ढोल ताशा; पुणेरी ‘शिवम’ ढोल पथकाचा आवाज घुमणार

follow us