Download App

रशियन तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा होता; खळबळजनक खुलासा, रशियानेही सुनावलं

ज्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेलाच वाटत होतं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करावं

US India Tariffs : रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचं पित्त खवळलं आहे. युक्रेनमध्ये निर्दोष लोक मारले जात आहेत. पण भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करुन जागतिक बाजारात विक्री करुन बक्कळ नफा कमावत आहे. तेव्हा आता भारतावर आणखी टॅरिफ वाढवू असा इशारा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यावर रशियानेही ट्रम्प यांनी सडेतोड उत्तर दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एक ट्विस्ट आला आहे. ज्यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेलाच वाटत होतं की भारतानं रशियाकडून तेल खरेदी करावं, अशी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे.

भारतातील माजी अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांचे एक जुने वक्तव्य आता व्हायरल होत आहे. आम्ही रशियन तेल खरेदीसाठी नवी दिल्लीला समर्थन करतो असे गार्सेटी म्हणताना दिसत आहेत. माजी राष्ट्रपती जो बायडेन यांच्या कार्यकाळात गार्सेटी भारतात राजदूत होते. आता त्यांचं दोन वर्षांपूर्वीचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताने रशियाकडून तेल खरेदी केलं कारण आम्हला (अमेरिका) वाटत होतं की कुणीतरी रशियाकडून तेल खरेदी करावं. याद्वारे कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन होत नव्हतं उलट धोरणाचाच एक भाग होता. कारण तेलाच्या किंमती वाढाव्यात असं आम्हाला आजिबात वाटत नव्हतं. भारताने प्रतिबंधित रशियन तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला याबद्दल आम्ही आनंदी आहोत असे गार्सेटी म्हणाले होते.

डोनाल्ड ट्रम्पने मोदींना खिंडीत गाठले; टॅरिफ लादून घेणार की रशियाच्या मैत्रीला जागणार..

गार्सेटी यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. नंतर अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने 2024 च्या सुरुवातीला एक निवेदन जारी केले. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात बंद करावी असे अमेरिकेने म्हटलेले नाही असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. फक्त गार्सेटीच नाही तर तत्कालीन अमेरिकी ट्रेझरी सचिव जेनेट येलेन यांनी देखील भारताच्या रशियन तेल खरेदीवर समाधान व्यक्त केले होते.

रशियाला आधार अन् भारताला स्वस्तात तेल

भारताला तेल हवेच होते त्यातही अरब देशांच्या तुलनेत रशिया कमी दरात तेल देतोय म्हटल्यावर भारताने रशियाच्या तेल खरेदीत वाढ केली. उदाहरणच द्यायचे झाले तर युद्धाआधी भारत फक्त 0.2 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत होता. परंतु, आता 35 ते 40 टक्के तेल खरेदी करत आहे. इतका मोठा व्यापार एक दिवसात नक्कीच झालेला नाही. मग भारताच्या भूमिकेत इतका मोठा बदल कसा झाला याची माहिती आता घेऊ.

भारत याआधी इराक, सौदी अरब आणि पश्चिम आशियातील देशांकडून तेल खरेदी करत होता. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली. जुलै महिन्यात भारताने 36 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले आहे. फक्त रशियाच नाही तर अमेरिकेकडूनही भारताने कच्चे तेल आयात केले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाला किती पैसा देतो भारत? जाणून घ्या, टॉप 10 मध्ये किती देश..

follow us