डोनाल्ड ट्रम्पने मोदींना खिंडीत गाठले; टॅरिफ लादून घेणार की रशियाच्या मैत्रीला जागणार..

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर प्रचंड चिडलेत. त्यांची आतल्याआत घुसमट होत आहे. पक्के व्यापारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांनी आता भारत-रशियाच्या तेल व्यापाराकडे मोर्चा वळवला आहे. ‘युक्रेनमध्ये निर्दोष लोक मारले जात आहेत. पण भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करुन मोठ्या नफ्यासह तेल जागतिक बाजारात विकत आहे. आता आम्ही भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर आणखी टॅरिफ लावू’, असा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांचा त्रागा स्पष्ट दिसून येत आहे. पण असे का? ट्रम्प यांना भारत आणि रशियाची मैत्री अन् व्यापार का खटकतोय? युक्रेनमधील लोकांची त्यांना इतकी चिंता का? भारत रशियाकडून असे किती तेल खरेदी करतो? त्यातून भारताला खरंच फायदा मिळतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
सर्वात आधी आपण डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके का चिडलेत? भारताचे मित्र म्हणवले जाणारे ट्रम्प इतके विरोधात कसे गेले यामागे काय पार्श्वभुमी आहे याचा थोडक्यात आढावा घेऊ.
खरंतर या सगळ्या वादाला रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभुमी आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धला तोंड फुटलं. तीन वर्षे उलटून गेली तरीही युद्ध संपलेलं नाही. या युद्धात अमेरिकेसह युरोपीय देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला. लष्करी मदत केली. आर्थिक मदत केली. शस्त्रास्त्रे दिली. या मदतीमुळेच युक्रेन अजूनही युद्धात टिकून आहे. या बरोबरच पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले. या निर्बंधामुळे रशियाच्या व्यापारावर मोठा परिणाम होऊ लागला. अनेक देशांनी रशियाबरोबरील व्यापार एकतर कमी केला किंवा पूर्ण बंद करून टाकला. यामुळे रशियाची अर्थव्यवस्थाच धोक्यात येऊ लागली मात्र याच काळात भारत आणि चीनने रशियाला मदतीचा हात दिला. या दोन्ही देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी सुरू केली.
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा हादरा; 25 टक्के टॅरिफ वाढवणार असल्याची केली घोषणा
रशियाला आधार अन् भारताला स्वस्तात तेल
भारताला तेल हवेच होते त्यातही अरब देशांच्या तुलनेत रशिया कमी दरात तेल देतोय म्हटल्यावर भारताने रशियाच्या तेल खरेदीत वाढ केली. उदाहरणच द्यायचे झाले तर युद्धाआधी भारत फक्त 0.2 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करत होता. परंतु, आता 35 ते 40 टक्के तेल खरेदी करत आहे. इतका मोठा व्यापार एक दिवसात नक्कीच झालेला नाही. मग भारताच्या भूमिकेत इतका मोठा बदल कसा झाला याची माहिती आता घेऊ.
भारत याआधी इराक, सौदी अरब आणि पश्चिम आशियातील देशांकडून तेल खरेदी करत होता. परंतु, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली. जुलै महिन्यात भारताने 36 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले आहे. फक्त रशियाच नाही तर अमेरिकेकडूनही भारताने कच्चे तेल आयात केले होते.
रशियाच नाही अमेरिकाही भारताला देतोय तेल
मागील तीन महिन्यांचा विचार केला तर भारताने तब्बल 114 टक्के तेल खरेदी केल्याची माहिती आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात भारताने अमेरिकेकडून 30 हजार 710 कोटींचे तेल आयात केले होते. मागील वर्षात ही आयात फक्त 14 हजार 359 कोटी इतकी होती. जानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या काळात भारताने अमेरिकेकडून 51 टक्क्यांहून अधिक तेल खरेदी केले. रशियाचा विचार केला तर भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात जूनमध्ये 21 लाख बॅरल प्रति दिवसावरुन जुलैमध्ये 18 लाख प्रति दिवसावर आली आहे.
वैश्विक रियल टाइम डेटा आणि अॅनालिटिक्स प्रोव्हायडर केप्लरनुसार जानेवारी 2022 मध्ये भारताने प्रत्येक दिवशी 68 हजार बॅरल तेल रशियाकडून खरेदी केले आहे. या महिन्यात भारताने दर दिवशी इराककडून 12.3 लाख तर सऊदी अरबकडून 8.83 लाख बॅरल तेल खरेदी केले होते.
भारताकडून मिळालेला पैसा जाणार अमेरिकी नागरिकांच्या खिशात; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी आयडीया..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भारताचे उत्तर
भारताने रशियन तेल खरेदी थांबवावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. कारण त्याशिवाय रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देता येणार नाही. रशियाला मिळणारा पैसा थांबवता येणार नाही. परिणामी युद्धही थांबणार नाही असे गणित यामागे असू शकते. याच दृष्टीने ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. भारतीय उत्पादनांवर 25 टक्के टॅरिफची घोषणा केली. दोन्ही देशांतील तेल व्यापार पाहता या टॅरिफमध्ये आणखी वाढ करू असा इशारा नुकताच दिला.
भारत खरंच रशियन तेलाची खरेदी बंद करणार ?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेला भारत सरकारने थेट उत्तरं दिलेलं नाही. भारत खरंच रशियाकडून तेल खरेदी बंद करणार का? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही तरी सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांची वक्तव्ये पाहता तेल खरेदी बंद होणार नाही असेच संकेत मिळत आहेत. याउपरही भारताने रशियन तेलाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतलाच तर यात भारताचेच नुकसान होण्याची शक्यता आहे. भारताचा तेल आयातीवरचा खर्च वर्षाला तब्बल 74 हजार 700 कोटी ते 91 हजार 300 कोटींपर्यंत वाढू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला मोदी सरकार कसे उत्तर देणार? स्वतःचे नुकसान करून तेलाची खरेदी बंद करणार की रशियाबरोबरच्या मैत्रीला जागणार याची उत्तरं लवकरच मिळतील.