USA News : अमेरिकेत स्थायिक होण्याच अनेक भारतीयांचं स्वप्न आहे. आजमितीस लाखो भारतीय अमेरिकेत शिफ्ट झाले आहेत. गुण्यागोविंदानं राहत आहेत. दरवर्षी लाखो भारतीय आपला जीव धोक्यात घालून अमेरिकेचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत असतात. या स्वप्नामागे आर्थिक स्थिरता, चांगलं जीवनमान आणि करिअरच्या संधी अशी काही कारणं आहेत. परंतु हे स्वप्न साकार करणं इतकही सोपं नाही. जे लोक बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत दाखल होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मात्र अनेक अडचणी निर्माण होतात. कायदेशीर मार्गाने अमेरिकेत स्थायिक व्हायचं असेल तर यासाठी पैसे आणि भरपूर कालावधी लागतो. असे असतानाही भारतीयांचा अमेरिकेकडे वाढलेला ओढा पाहता अमेरिकेची क्रेझ कमी झालेली नाही हे स्पष्ट होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अवैध मार्गाने अमेरिकेत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या विरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत. मेक्सिको हद्दीवर आणीबाणी घोषित करण्यासह अन्य आवश्यक निर्णय घेतले जात आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयांचा परिणाम अवैध पद्धतीने देशात घुसखोरी करणाऱ्या लोकांवर पडू लागला आहे. भारतीय प्रवाशांना सुद्धा या निर्णयांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजमितीस अमेरिकेत जवळपास 54 लाख भारतीय आहेत. यातील दोन तृतीयांश अप्रवासी आहेत.
याच दरम्यान अमेरिका दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की अवैध पद्धतीने अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांना परत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. यानंतर आता अशा बातम्या येत आहेत की अमेरिकेत अवैध पद्धतीने राहणाऱ्या 18 हजार भारतीयांची मायदेशी वापसी होणार आहे. अमेरिकी वेबसाईट ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या लोकांकडे अमेरिकेचे नागरिकत्व नाही. तसेच येथील नागरिकत्व मिळवण्यासाठी योग्य कागदपत्र देखील त्यांच्याकडे नाहीत.
मागील काही वर्षांपासून डंकी रूट द्वारे अमेरिकेत दाखल होणाऱ्या भारतीयांची संख्या वेगाने वाढली आहे. हा रस्ता खूप धोकादायक असून यामध्ये दलाल आणि तस्करांची मदत घेतली जाते. या एजंटच्या मदतीने आधी भारतीयांना मध्यपूर्व युरोप किंवा आफ्रिकेत पाठवले जाते. आणि नंतर मेक्सिको किंवा कॅनडा मार्गाने अमेरिकेत पोहोचवले जाते.
युएस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2023 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत 90 हजार 415 भारतीय नागरिकांना अवैध पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले. यातील बहुतांश लोकांना मेक्सिको आणि कॅनडा बॉर्डरवर रोखण्यात आले. कोविड 19 नंतर तर अशा घटना वाढल्या आहेत. 2020-21 मध्ये 30 हजार 662 भारतीय पकडले गेले होते तर 2023-24 मध्ये यात वाढ होऊन हा आकडा 90 हजार 415 पर्यंत पोहोचला आहे.
युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनला मिळणारी मदत अमेरिका रोखणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय
भारतात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. तसेच येथे संधी सुद्धा कमी आहेत. या दोन्ही गोष्टी अमेरिकेत नाहीत. भारताच्या तुलनेत लोकसंख्या कमी असल्याने राहणीमान उच्च आहे. या गोष्टी भारतीयांना आकर्षित करतात. पिरियोडिक लेबर सर्वेनुसार सन 2023-24 मध्ये पदवीधर आणि उच्च पदवीधर यांच्यातील बेरोजगारीचा दर 12 टक्क्यांपेक्षा जास्त होता. या अगदी उलट अमेरिकेत भारतीय लोकांचे वार्षिक उत्पन्न 51 ते 56 लाख रुपये इतके आहे. एक भारतीय अमेरिकी परिवाराच सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल 1.25 कोटी रुपये आहे. अमेरिकी परिवाराच्या तुलनेत हे उत्पन्न दुप्पट आहे.
अमेरिकेत स्थायिक होण्याचा प्रत्येकाचच स्वप्न पूर्ण होत असही नाही. प्यू रिसर्च रिपोर्टनुसार 23 लाख आशियाई अमेरिकी गरिबीत आयुष्य व्यतीत करत आहेत. यामध्ये भारतीय अमेरिकी लोकांची स्थिती तुलनेने चांगली आहे. परंतु प्रत्येक दहा आशियाई अमेरिकी नागरीकांपैकी एक गरीब आहे. 38 टक्के आशियाई अमेरिकी भोजनासाठी फूड बँक किंवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावर अवलंबून आहेत. या सर्वेमध्ये सहभागी 47 टक्के लोकांचे म्हणणे होते की अमेरिकेत येऊन त्यांचीही स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. तरीही भारतीय अमेरिकी लोकांमध्ये गरिबी दर फक्त 6 टक्के आहे. अन्य आशियाई अमेरिकी लोकांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे.