Download App

पुराने हाहाकार! स्पेनमध्ये २०० पेक्षा जास्त मृत्यू; आणीबाणीची घोषणा

युरोपातील देश स्पेन सध्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. देशात मोठा पूर आला असून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

Flood in Spain : युरोपातील देश स्पेन सध्या नैसर्गिक संकटाचा (Flood in Spain) सामना करत आहे. देशात मोठा पूर आला असून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका वेलेन्सिया या शहराला बसला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार या वादळा आतापर्यंत कमीत कमी २०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. वेलेन्सिया शहरातच सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. काही भागातील रस्ते नष्ट झाले आहेत. त्यामुळे आवश्यक सेवा सुविधा संकटग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

स्पेनच्या हवामान विभागाने दक्षिण पश्चिम भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हुलेवामध्ये सलग बारा तास 140 मिलीमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे. अन्य ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रासेना, आंदेवालो आणि कोंडाडो या भागात पावसाचा ऑरेंज तर वादळाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्पॅनिश सैन्याचे इमर्जन्सी रिस्पॉन्स युनायटेडचे जवळपास एक हजार सदस्य ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. या सदस्यांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पुरामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे तसेच फोन नेटवर्कही विस्कळीत झाले आहे.

स्पेनचे राष्ट्रअध्यक्ष पेड्रो सांचेझ यांचा पहिला भारत दौरा अन् यशराज फिल्म्सला भेट

दाना वादळाच्या प्रभावाने देशात अतिमुसळधार पाऊस झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. याच पद्धतीच्या घटना 1966 आणि 1957 मध्ये झाल्या होत्या. तेव्हा देखील मोठे नुकसान झाले होते. येथील टुरिया नदीला पूर आला होता आणि वेलेन्सिया शहर उद्धवस्त झाले होते.

स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या संकटात जे लोक आपल्या आप्त स्वकियांचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी देशभरातील लोकांना वेदना होत आहेत. आम्ही संकटग्रस्तांची मदत करण्याचे भरपूर प्रयत्न करत आहोत. घरात आणि वाहनांत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. पुराने प्रभावित झालेल्या ठिकाणी सैन्याचे ११०० जवान तैनात करण्यात आले आहेत.

follow us