Download App

व्यापारात हिंदी-चिनी भाई भाई; चीन बनला भारताचा नंबर वन बिजनेस पार्टनर

व्यापारातील भागिदारीचा विचार केला तर अमेरिका भारताचा मोठा पार्टनर राहिला आहे. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात चित्र एकदम बदलले आहे.

India Trade with China : पाकिस्ताननंतर चीनसुद्धा भारतासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. भारताला त्रास (India Trade with China) देण्याची एकही संधी चिनी राज्यकर्ते सोडत नाहीत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या दोन्ही देशांत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद होत असतात. चीनच्या या उद्योगांवर भारतीय नागरिकही रोष व्यक्त करत असतात. बॉर्डवरील चीनची दादागिरी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण असे असले तरी व्यापाराच्या बाबतीत आजही अनेक गोष्टींच्या बाबतीत भारताला चीनवरच अवलंबून राहावे लागत आहे, यात काहीच शंका नाही. भारत सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगभरातील अनेक देशांबरोबर भारताचा व्यापार वाढला आहे.

व्यापारातील भागिदारीचा विचार केला तर अमेरिका भारताचा मोठा पार्टनर राहिला आहे. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात चित्र एकदम बदलले आहे. यावर्षात अमेरिका नाही तर चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून पुढे आला आहे. आर्थिक थिंक टँक जीटीआरआयनुसार (ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह) दोन्ही देशांदरम्यान तब्बल 118.4 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. अमेरिका दोन नंबरवर राहिला आहे.

Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?

जीटीआरआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारत आणि चीन दरम्यान आयात निर्यात व्यापार 118.4 अब्ज डॉलर्स झाला आहे. यामध्ये भारताकडून चीनला होणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्यातीत 8.7 टक्क्यांनी वाढ होऊन हा व्यापार 16.67 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. चीनला भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर नजर टाकली तर यामध्ये लोह, सूती धागा, कपडे, मसाले, विविध फळे, भाजीपाला, प्लास्टिक आणि लिनोलियम यांचा समावेश आहे.

चीनकडून भारताने काय काय खरेदी केले

रिपोर्टनुसार चीनकडून भारताला आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने चीनकडून केलेल्या वस्तूंच्या आयातीत 3.24 टक्के वाढ झाली आहे. आता हा व्यापार 101.4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. चीनकडून भारतात येणाऱ्या वस्तूंवर नजर टाकली तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक सामान, न्युक्लिअर रिएक्टर्स, बॉयलर, ऑरगॅनिक केमिकल, प्लास्टिक समान, फर्टीलायझर, वाहनांसाठीच्या विविध वस्तू, केमिकल उत्पादने यांचा समावेश आहे.

अमेरिकेचा नवा ‘स्क्वॉड’! चीनला धक्का, भारतालाही टेन्शन; नवा प्लॅन काय?

अमेरिकेबरोबर व्यापार घटला

जीटीआरआय नुसार 2023-24 या आर्थिक वर्षात अमेरिका आणि भारतातील व्यापार 118.4 अब्ज डॉलर्सचा राहिला आहे. याआधीच्या दोन आर्थिक वर्षात अमेरिकाच भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर होता. आता मात्र दोन्ही देशांतील व्यापार घटला आहे. मागील वर्षात भारताकडून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंत 1.32 टक्क्यांची घट झाली. या वर्षात भारताकडून अमेरिकेला निर्यात व्यापार 77.5 अब्ज डॉलर्स इतका राहिला. आयात व्यापारात सुद्धा वीस टक्के घट झाल्याचे दिसून आले. आता हा व्यापार 40.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

पाच वर्षात असा बदलला व्यापाराचा ट्रेंड

जीटीआरआयनुसार 2019 पासून 2024 पर्यंत भारताच्या टॉप 15 ट्रेड पार्टनर देशांबरोबरील व्यापारात मोठा बदल झाला आहे. या पाच वर्षांच्या काळात चीनला निर्यात 0.6 टक्क्यांनी घटली आहे. तर चीनकडून आयात 70.32 अब्ज डॉलर्सवरून थेट 101.75 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते आयातीत वाढ झाल्याने व्यापारात तोटा वाढला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात व्यापारतील ही तूट 53.57 अब्ज डॉलर्स इतकी होती. आता 2023-24 या आर्थिक वर्षांपर्यंत यात वाढ होऊन हा आकडा 85.09 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.

follow us