महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Paper leak) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा आणि त्यासंदर्भातील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर 20 मार्च रोजीच फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या चौकशीनंतर आयोगाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, भरती प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच पेपरफुटीचा आरोप करत यंत्रणांकडं पाठपुरावा केला होता. पत्रकार परिषदेत सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला होता. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर लवकरच फेरपरीक्षा घेण्याची तयारी आयोगाकडून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
MPSC : औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटला? गुन्हा दाखल होणार; MPSC ने स्पष्ट सांगितलं
दरम्यान, औषध निरीक्षक पदाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. पेपरफुटीच्या आरोपांमुळं विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची माहिती त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिलं होतं. तसंच, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र, त्याआधीच शासन आणि आयोगाने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीला महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे
परीक्षा रद्द झाल्यानंतर रोहित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पेपरफुटीचा मुद्दा पुराव्यांसह समोर आणून तपास यंत्रणांकडं पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, केवळ एका विद्यार्थ्याकडं पेपर असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यभरातील एजंटच्या रॅकेटमार्फत पेपर 40-40 लाख रुपयांना विकला गेल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षा घेण्यासोबतच पेपरफुटीच्या कथित रॅकेटमागील सूत्रधारांवर काय कारवाई होते, याकडं उमेदवारांचे लक्ष लागलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने रद्द केली असून, पेपरलीकचा मुद्दा पुराव्यासह समोर आणत तपास यंत्रणांकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात आला होता. तपासातही पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, केवळ एका विद्यार्थ्याकडे पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण मान्य करण्यासारखे नाही. राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत 40-40 लाख रुपयांना पेपर विकला गेल्याची वस्तुस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला असून, ही बाब आयोगालाही माहीत असल्याचे म्हटले आहे. आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, तसेच आपण दिलेल्या एजंटच्या नावांचे पुढे काय झाले, आयोगातील कोणी या प्रकरणात सहभागी आहे का आणि कोणाचा वरदहस्त आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आयोगाचा पेपरलीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आपण गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच सरकारने स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करून राज्यातील जनतेला या प्रकरणाची वस्तुस्थिती सांगावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर… pic.twitter.com/OZMkg6pplf
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2026
