दिशा सालियान प्रकरणावरून सुरू (Disha Salian) असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता नवं वळण मिळालं आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटिशीला आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी तब्बल 26 पानांचं उत्तर दिलं असून, त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडून नोटिशीतील आरोप स्पष्टपणे फेटाळण्यात आले आहेत. 16 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियान यांचं नाव कुठेही घेण्यात आलेलं नव्हतं, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. तसंच संबंधित पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियान यांच्याकडे निर्देश करत नसल्याचंही उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.
दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; वरुण सरदेसाईंचे विरोधकांना थेट आव्हान
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणातील आरोपांची अधिकृत आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे यांच्या उत्तरात म्हटलं आहे. या प्रकरणाची सत्यता समोर यावी यासाठी निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे. सतीश सालियान यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असंही आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळं 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीवरून दोन्ही बाजूंची भूमिका आता समोर आली आहे. सतीश सालियान यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी ते पूर्णपणे फेटाळले असून, संबंधित प्रकरणात अधिकृत तपासाची मागणी केली आहे. 26 पानी उत्तरामुळं दिशा सालियान प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडं आता लक्ष लागलं आहे.
