Baramati Double Murder Case; Supriya Sule Raises Law and Order Concerns: बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन महिलांची गळा चिरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती परिसरात सलग घडत असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) यांना पत्र लिहून कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडाचा तपास करताना ही घटना प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने झाल्याचे दिसत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल (Sandip Singh Gill) यांनी दिली आहे. घटनास्थळी घरातील कपाट उघडलेले आढळून आले असून, मृत महिलांच्या अंगावरील सुमारे सहा तोळे दागिने गायब असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बारामती येथे भेट देऊन घटनास्थळाची आणि तपासाची माहिती घेतली. प्राथमिक तपासानुसार, इंदुमती लडकत आणि कृष्णाबाई लडकत यांच्या अंगावरील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तींनी हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांनी घराची चावी मिळवण्याचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर घरातील कपाट उघडण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. मात्र, घरातून अपेक्षित वस्तू न मिळाल्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले असावेत. यावेळी महिलांनी प्रतिकार केला किंवा आरोपींची ओळख पटण्याची भीती निर्माण झाल्याने आरोपींकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
1 ऑक्टोबरपासून FDचे नियम बदलणार; मोठी रक्कम जमा करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
मात्र, हत्येमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणाचा तपास विविध पातळ्यांवर सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि तांत्रिक तपास पथकाच्या माध्यमातून पुरावे गोळा केले जात आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक गिल यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांत गंभीर गुन्ह्यांच्या घटना समोर आल्याने पोलिसांपुढे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री माळेगाव येथे टोळक्याने केलेल्या कोयता हल्ल्यात तीन युवक जखमी झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेरेवाडी येथे दोन महिलांची हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
संजय राऊतांच्या पत्रानंतर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; 12 अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
शेरेवाडीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू असून, चोरीच्या उद्देशानेच ही घटना घडली का, हत्येमागे अन्य कोणते कारण होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
