Download App

लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे, भाजपचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Dilip Bhalsingh On Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe) यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग (Dilip Bhalsingh)यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहमदनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे. दिलीप भालसिंग म्हणाले की, 500 वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला होता.

सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कोणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही. असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केला. याच बरोबर पाच वर्षे ‘आपला माणूस’म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे. तुम्ही गेल्या पाच वर्षात लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लंके यांना दिलीप भालसिंग यांनी लावला.

विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही. त्यासाठी ते स्वत: सक्षम आहेत. सामाजिक बांधिलकी ही काय असते हे विखे पाटील परिवाराकडून लंकेनी शिकावे असा सल्ला सु्द्धा भालसिंग यांनी दिला. गेल्या 50 वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे. त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही. हे खंडणीखोर आपला माणूस असल्याचा टेंबा मिरवणाऱ्याला काय कळणार? मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या निलेश लंके यांना काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.

विखेंनी तरी डाळ साखर वाटून लोकांचा आंनद गोड केला. पण तुम्ही सुपा एमआयडीसीतील व्यापाऱ्यांचे खिसे कापून त्यांना दरिद्री बनवले आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे तपासून घ्यावे असा सल्ला दिलीप भालसिंग यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

follow us