सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित (FDA) अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 शीतगृहांवर छापे टाकले. 17 ऑक्टोबर रोजी बिडकीन येथील मे. फ्रिओ वेअरहाउसिंग प्रा. लि. आणि गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील मे. मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. येथे तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 लाख 97 हजार 480 किलो विना-लेबल आणि संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 4 कोटी 18 लाख रुपये आहे. जप्त साठ्यात मिरची पावडर, मनुका, गूळ आणि बटरचा समावेश आहे. ही कारवाई ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील फ्रिओ वेअरहाउसिंग प्रा. लि. या शीतगृहात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना न देता तपासणी केली. यावेळी उत्पादनांच्या गरजेनुसार तापमान राखणारी फ्रीजर आणि चिलर यंत्रणा कार्यरत नसल्याचं आढळलं. माल पॅलेटवर व्यवस्थित न ठेवता अस्ताव्यस्त साठवण्यात आला होता. कीटक नियंत्रणाची अधिकृत व्यवस्था, स्वच्छतेचं वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी यांचाही अभाव आढळला. कर्मचाऱ्यांना हातमोजे, टोपी आणि संरक्षक ॲप्रन यांसारखी वैयक्तिक स्वच्छतेची साधनंही उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. या ठिकाणाहून 1 लाख 65 हजार 805 किलो मिरची पावडर आणि मनुका जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत 3 कोटी 89 लाख 40 हजार 350 रुपये आहे.
दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई
गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. येथेही तपासणीदरम्यान अनेक त्रुटी समोर आल्या. व्यवसायाच्या दर्शनी भागात अद्ययावत एफएसएसएआय परवाना लावलेला नव्हता. अन्नसाठवणुकीच्या जागेत पुरेसा प्रकाश नव्हता, तर कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्थाही उपलब्ध नव्हती. शीतगृहातील तापमानाच्या नोंदी ठेवण्याची यंत्रणा आणि रेकॉर्ड बुक नसल्याचं आढळलं. ‘फर्स्ट इन, फर्स्ट आउट’ या साठवणूक पद्धतीचं पालन होत नव्हतं, तसेच कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नव्हती. या कारवाईत 31 हजार 675 किलो गूळ, मनुका आणि पाश्चराइज्ड बटर असा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत 30 लाख 7 हजार 284 रुपये आहे.
दोन्ही शीतगृहांमधून जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत संबंधितांविरुद्ध अन्न न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे दोन्ही संस्थांचे अन्न परवाने सहायक आयुक्त (परिमंडळ-1, छत्रपती संभाजीनगर) यांनी तात्काळ निलंबित केले आहेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकारांबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा mahafda.in या पोर्टलवर संपर्क साधावा, असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
