अन्न व औषध प्रशासनाची राज्यभरात कारवाईचा धडका; पिझ्झा डॉमिनोजसह अनेक आस्थापनांवर थेट कारवाया
डॉमिनोज पिझ्झाच्या विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील तीन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार (FDA) अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत अन्न व्यावसायिकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. २० जुलै ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत राज्यातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, बेकरी आणि साखळी उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर परवाने निलंबित करणे, सुधारणा नोटिसा देणे तसेच अन्नसाठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
राज्यभरातील साखळी उपाहारगृहांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. डॉमिनोज पिझ्झाच्या विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील तीन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. तसेच कराड येथील डॉमिनोज पिझ्झा आणि सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडच्या आस्थापनावरही कारवाई करण्यात आली. तपासणीत अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्न व बिगर-अन्न वस्तूंची स्वतंत्र साठवणूक, कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता सुविधा आणि आवश्यक नोंदी यामध्ये त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
मुंबईतील डॉमिनोजच्या काही आस्थापनांमध्ये एफएसएसएआय परवाना प्रदर्शन, पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नसाठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधांबाबत त्रुटी आढळल्या. गोठविलेल्या अन्नपदार्थांचे योग्य तापमान राखणे, अन्न तयार करण्याच्या भागात स्वच्छता ठेवणे, स्वयंपाकघरातील उंदीर व कीटकांचा प्रवेश रोखणे आणि कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडे इफेक्ट, महाग होणार पनीर पदार्थ; कारण काय?
कराड येथील डॉमिनोजच्या आस्थापनातही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्या. कच्च्या मालाची योग्य साठवणूक, प्रयोगशाळा तपासणीच्या नोंदी, उपकरणांची स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्नसुरक्षा नोंदी आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणाची व्यवस्था याबाबत त्रुटी निदर्शनास आल्या. सॅफायर फूड्स इंडिया लिमिटेडच्या कराड येथील आस्थापनात शाकाहारी व मांसाहारी पिझ्झासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, वापरल्या जाणाऱ्या पॅनचे योग्य वर्गीकरण न करणे तसेच काही खाद्यपदार्थांच्या पॅकिंगवर पॅकिंग व कालबाह्यता दिनांकाची नोंद नसणे आढळले.
राज्यभरातील विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांवरही मोठी कारवाई करण्यात आली. सुमारे १,१५० किलो दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ३३,३९,७९८ रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. इतर अन्नपदार्थांचा सुमारे ४,६०,९१० रुपये किमतीचा आणि ४३८३.४ किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आला. एकूण १२० हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करून ५४ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात संशयित निकृष्ट दर्जाचे १८२ लिटर पाश्चराइज्ड गायीचे दूध जप्त करण्यात आले. या दुधाची किंमत ३४,३०२ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित व्यवसाय विनानोंदणी चालविला जात असल्याचे तपासणीत आढळले. नाशिकमध्येही संशयित निकृष्ट दर्जाच्या तुपाचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीत KMP कृष्णा काऊ घी, मधुली काऊ घी आणि श्रीमयी काऊ घी या नावांचे एकूण ३९७.६ किलो तूप, किंमत २,७५,८१२ रुपये, जप्त करण्यात आले.
अकोला येथे पिझ्झा हटमधून ५५ किलो गोठविलेला पनीर जप्त करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील एका आस्थापनावर स्वयंपाकघर व साठवणूक परिसरातील अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित करण्यात आला. पालघर येथील एका हॉटेलमध्येही अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई करण्यात आली.
प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातही धडक मोहीम
गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारी यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातही १० ते ११ ऑगस्टदरम्यान राज्यभर विशेष कारवाई करण्यात आली. राज्यातील १५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १५ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळले. या कारवाईत सुमारे ३५ लाख १६ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. १२ एफआयआर दाखल, १५ जणांना अटक, ९ आस्थापने सील तसेच ३ वाहने जप्त करण्यात आली.
पुणे विभागातही प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात कारवाई करत सुमारे ३३ लाख ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ८ एफआयआर दाखल करून ९ जणांना अटक करण्यात आली असून ४ आस्थापने सील आणि एक वाहन जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातही प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली.
एकूण १५ आस्थापनांची तपासणी, ३५ लाखांहून अधिक साठा जप्त
१० ते ११ ऑगस्टदरम्यान राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील कारवाईचा आढावा घेतला असता १५ आस्थापनांची तपासणी, १५ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त, ३५ लाख १६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त, १२ एफआयआर, १५ अटक, ९ आस्थापने सील आणि ३ वाहने जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संशयित निकृष्ट गूळ, आमखंड आणि मावा मिठाईचा साठा जप्त
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेंतर्गत कोल्हापूर व पुणे येथेही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात संशयित निकृष्ट दर्जाचा गूळ जप्त करण्यात आला. एका ठिकाणी १,३४५ किलो गूळ, किंमत सुमारे १,९४,४०० रुपये, जप्त करण्यात आला. तसेच आमखंडाचा सुमारे १५ किलो साठा जप्त करण्यात आला.
पुणे येथे ‘श्री आई जी’ ब्रँडची मावा मिठाई आढळून आली. या कारवाईत १५८ किलो मावा मिठाई, किंमत १,१४,४०० रुपये, जप्त करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थांची विनापरवाना वाहतूक, वाहनामध्ये तापमान नियंत्रणाचा अभाव, लेबलिंग नियमांचे उल्लंघन आणि अन्नपदार्थ संशयित निकृष्ट व असुरक्षित असल्याचा संशय या कारणांवरून कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात चांदवड येथील ताडी विक्री केंद्रावरही कारवाई करण्यात आली. अस्वच्छ पद्धतीने साठविलेला ७८ लिटर ताडीचा साठा, किंमत सुमारे ३,९२० रुपये, जप्त करून नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच इतर संशयित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक आढळल्यास जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला किंवा संबंधित यंत्रणेला त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी विविध विभागांमध्ये साखळी उपाहारगृहांची विशेष तपासणी मोहीम राबवली. राज्यभरात एकूण १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ आस्थापनांचा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात आला, ९५ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आणि ५ परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीमध्ये डॉमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स, मॉंगिनीस आदी साखळी उपाहारगृहांचाही समावेश होता. तसेच १० ते ११ ऑगस्टदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थ, ताजी, खाद्यतेले व मसाला पदार्थ यासंदर्भात १२ आस्थापनांवर कारवाई करून एकूण ५,३४३.५ किलो साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ९ लाख ८० हजार ९९० रुपये आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व ढाब्यांच्या १२० तपासण्या करण्यात आल्या असून ५४ सुधारणा नोटिसा आणि ११ परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हिंगोली येथे सुट्या स्वरूपात विक्री होत असलेल्या १९८ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ लाख ९४ हजार ६६० रुपये आहे. सैल स्वरूपात विक्री करणे हे कारवाईचे कारण नमूद करण्यात आले आहे. १० ते ११ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांसंदर्भात राज्यभरात १५ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ लाख ९६ हजार ७२७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला, १२ आस्थापनांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले, १५ जणांना अटक करण्यात आली, ९ आस्थापने सील करण्यात आली आणि ३ वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहनांची किंमत १० लाख रुपये आहे. અन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना FoSCoS Portal, Food Safety Connect App, टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसंच Food & Drug Grievance Portalचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.