पहिलं चायनीज पुण्यात खाल्लं, आता चायनीज फूडच्या दर्जाची तपासणी करणं गरजेचं वाटतं – तुकाराम मुंढे
विद्यार्थी जीवनातील संघर्ष, पुण्याशी जुळलेले नाते, स्ट्रीट फूडच्या आठवणी आणि सध्याच्या कारवाईंबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
Clear indications from Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे चर्चेत आहेत. मात्र पुण्यात आयोजित एका प्रकट मुलाखतीत त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील संघर्ष, पुण्याशी जुळलेले नाते, स्ट्रीट फूडच्या आठवणी आणि सध्याच्या कारवाईंबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेल्या या मुलाखतीत मुंढे यांनी अनेक रंजक अनुभव सांगितले.
पुण्यातील पहिल्या अनुभवाबाबत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, बीए पूर्ण झाल्यानंतर एमएच्या प्रवेशासाठी ते प्रथमच पुण्यात आले होते. एसटी महामंडळाच्या लालपरी बसने सकाळी शिवाजीनगर बसस्थानकावर उतरल्यावर त्यांना शहराची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे ते थेट पायी पुणे विद्यापीठात गेले. राज्यशास्त्र विभागात प्रवेशासाठी अर्ज भरल्यानंतर त्यांना प्रवेश मिळू शकतो, मात्र वसतिगृह मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठातील सर्व वसतिगृहांची जागा भरलेली असल्याने त्यांनी एसपी महाविद्यालयातही प्रयत्न केला.
तेथेही प्रवेशाची संधी होती, मात्र राहण्याचा प्रश्न कायम होता. अखेर संध्याकाळी ते परत गावी रवाना झाले. माझा पहिला पुणे प्रवास बसस्थानक, विद्यापीठ, एसपी कॉलेज आणि पुन्हा बसस्थानक इतकाच झाला, अशी आठवण त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी घरापासून दूर राहण्याच्या भीतीचाही उल्लेख केला. बीएपर्यंत ते कधीच कुटुंबापासून वेगळे राहिले नव्हते. संभाजीनगरमध्ये शिक्षण घेत असतानाही ते भावासोबत राहत होते. त्यामुळे एकटे राहणे आणि घरापासून दूर जाणे ही त्यांच्यासाठी मोठी मानसिक परीक्षा होती. पुढे यूपीएससीच्या तयारीसाठी ते पुण्यात आले.
‘सरकारला सद्बुद्धी दे’ तुळजाभवानीच्या साक्षीने जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल; प्रमाणपत्रे रद्द करत असल्याचा आरोप
त्यावेळी त्यांचा एक मित्र पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात एमए करत होता. त्याच्यासोबत ते एका खोलीत राहत होते. त्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणाले, खोलीत इतकी ढेकणं होती की रात्री झोपच लागत नव्हती. मित्राला मी गंमतीने सांगितलं होतं की आधी सांगितलं असतं तर मी इथे आलोच नसतो. पुण्यातील खाद्यसंस्कृतीशी झालेल्या पहिल्या परिचयाबाबतही त्यांनी अनुभव सांगितला. बापट रोड आणि पाषाण रोड परिसरातील चायनीजच्या गाड्यांवर त्यांनी पहिल्यांदा चायनीज खाद्यपदार्थ खाल्ले होते.
चायनीज म्हणजे काय हेच मला माहिती नव्हतं. चीनबद्दल इतिहास आणि युद्धाचा अभ्यास केला होता, पण चायनीज फूडचा नाही. पुण्यातच मी पहिल्यांदा चायनीज खाल्लं, असे ते म्हणाले. सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवायांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, आता चायनीज फूड स्टॉल्स आणि त्यांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
आवडत्या स्ट्रीट फूडबाबत विचारले असता मुंढे यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली. संभाजीनगरमध्ये शिक्षण घेत असताना नियमित जेवण मिळणे नेहमी शक्य होत नसे. त्यामुळे भेळ, आमलेट-पाव, फरसाण आणि केळी हेच अनेकदा त्यांचे मुख्य अन्न बनले होते. गावाकडे कधी आमलेट खाल्लं नव्हतं. त्यामुळे आमलेट-पाव माझ्यासाठी नवीन अनुभव होता आणि पुढे तेच नियमित खाणं झालं. फरसाण आणि केळी हे अनेक दिवस माझं मुख्य अन्न होतं, असे त्यांनी सांगितले.
एफडीएची बीडमध्ये छापा! बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त; कोटींच्या व्यवहाराची पोलखोल
मात्र आजच्या घडीला स्ट्रीट फूडबाबत त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात प्रतिकारशक्ती वेगळी होती. आता विचार केला तर कोणते तेल वापरले जात असेल, स्वच्छता किती असेल, असे अनेक प्रश्न पडतात. गेल्या दोन महिन्यांत अन्नसुरक्षेबाबत जे काही पाहिलं आणि अनुभवाला आलं, त्यानंतर आता मला कुठलेही स्ट्रीट फूड आवडत नाही, असे ते म्हणाले.
विद्यार्थीदशेतील संघर्ष, पुण्यातील पहिल्या अपयशाचा अनुभव, यूपीएससीच्या तयारीतील कठीण दिवस आणि आज अन्नसुरक्षेसाठी राबविल्या जाणाऱ्या कठोर मोहिमा यांचा प्रवास सांगताना तुकाराम मुंढे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या मनमोकळ्या संवादातून एका कठोर प्रशासकीय अधिकाऱ्यामागील संघर्षशील विद्यार्थी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळाली.