गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंची गर्दी, 33 रुग्णवाहिकांनाही मिळाला मार्ग; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Ganesh Visarjan Pune : पुण्यात लाखोंच्या गर्दीत गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली, पोलिसांच्या चोख नियोजनामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 26T210809.708

पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाखोंच्या गर्दीचं आव्हान असतानाही पोलिसांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळं उत्सव निर्विघ्न पार पडला. टिळक चौकातून सायंकाळी 6.15 वाजता शेवटचा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. यंदा मेट्रोमुळं मध्यवर्ती पुण्यात नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं गर्दीचं नियोजन पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.

गणेशोत्सवाच्या 12 दिवसांत पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. यंदा मेट्रो सेवेमुळं या गर्दीत आणखी भर पडली. एका दिवसात तब्बल 6 लाख नागरिकांनी मेट्रोमधून प्रवास केला. त्यामुळं मोठ्या संख्येनं नागरिक मध्यवर्ती भागात दाखल झाले होते. मात्र, गर्दीचे मार्ग, वाहतूक आणि सुरक्षेचं नियोजन आधीच केल्यानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश आलं.

पुण्यातील मानाच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन; पुढच्या वर्षीच्या गणेश आगमनाची तयारी सुरू

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, उत्सव किती तास चालला यापेक्षा तो सुरक्षित आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना पार पडणं महत्त्वाचं आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं होतं. गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा अनुचित प्रकार घडला नाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला नाही.

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर गर्दी आणि वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता असतानाही आपत्कालीन सेवांसाठी पोलिसांनी स्वतंत्र नियोजन केलं होतं. याच नियोजनामुळं टिळक चौकातून मिरवणुकीदरम्यान तब्बल 33 रुग्णवाहिका मार्गस्थ झाल्या. आपत्कालीन सेवांना अडथळा होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती. त्यामुळे गर्दीच्या काळातही वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा मार्ग खुला ठेवण्यात आला.

गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या सहकार्यामुळं विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. पोलिस आणि गणेश मंडळांमधील समन्वयाचा उत्सवाच्या नियोजनाला मोठा फायदा झाला. पुणेकरांनीही पोलिसांच्या बंदोबस्ताबाबत समाधान व्यक्त केलं असून, गणेशभक्तांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात पुणे महापालिका प्रशासनाचंही सहकार्य मिळालं.

follow us