Gold Silver Price Today : मोदी सरकारने सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. आज (13 मे) रोजी सराफ बाजारात सोन्याच्या दरात 11,055 किंवा अंदाजे 7% ची वाढ झाली आहे. तर प्रतिकिलो चांदीच्या दरात तब्बल 30 हजारांची वाढ पाहायला मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळा असा अवाहन भारतीयांना केल्यानंतर 12 मे रोजी केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयत शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने आयत शुल्क वाढवल्यानंतर आज बाजारात चांदीची किंमत 2 लाख 98 हजारपर्यंत पोहचली आहे तर सोन्याची किंमत 1 लाख 62 हजारपर्यंत पोहचली आहे. सरकारने हे शुल्क 6 टक्क्यांवरून वाढवून 15 टक्के केले आहे. परकीय चलन साठ्यावरील (Foreign Exchange Reserves) वाढता दबाव कमी करणे आणि सोन्याची अनावश्यक आयात रोखणे, हे सरकारचे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
नवीन नियमांनुसार, सोने आणि चांदीवरील ‘मूलभूत सीमा शुल्क’ (Basic Customs Duty) 5 टक्क्यांवरून वाढवून 10 टक्के करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तर 5 टक्के ‘कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर’ (AIDC) पूर्वीप्रमाणेच लागू राहील. त्यामुळे आता एकूण आयात शुल्क आता 15 टक्क्यांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात, ‘स्पॉट’ सोन्याच्या किमती 0.4 टक्क्यांनी घसरून प्रति औंस $4,695.99 वर स्थिरावल्या. याउलट, ‘स्पॉट’ चांदीच्या किमती 0.2 टक्क्यांनी वधारून प्रति औंस $86.71 वर पोहोचल्या. बाजारातील या हालचालींमागे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, तसेच अमेरिकेतून समोर आलेली अपेक्षेपेक्षा अधिक महागाईची आकडेवारी ही कारणे मानली जात आहेत.
