महाराष्ट्रातील अश्लील ‘डीजे लावणी’वर सरकारचा मोठा निर्णय; कार्यक्रमांसाठी आता ‘सूटेबिलिटी सर्टिफिकेट’ बंधनकारक

नवीन निर्देशांनुसार, कार्यक्रमातील संहिता, निवेदन किंवा सादरीकरणाचा सारांश रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे सादर करावा लागणार आहे.

Untitled Design (64)

Untitled Design (64)

Government’s major decision regarding obscene ‘DJ Lavani’ : महाराष्ट्रातील पारंपरिक लावणी, तमाशा आणि लोककलेच्या नावाखाली सादर होणाऱ्या कथित अश्लील कार्यक्रमांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लावणी, तमाशा, लोकनाट्य, लोकसंगीत, वग, मेळे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सूटेबिलिटी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित प्रमाणपत्राशिवाय अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन निर्देशांनुसार, कार्यक्रमातील संहिता, निवेदन किंवा सादरीकरणाचा सारांश रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे सादर करावा लागणार आहे. मंडळाकडून तपासणी केल्यानंतर कार्यक्रमात अश्लीलता, आक्षेपार्हता किंवा सांस्कृतिक मूल्यांना धक्का पोहोचवणारे प्रकार नसल्याची खात्री झाल्यानंतरच सूटेबिलिटी सर्टिफिकेट दिले जाणार आहे. त्यानंतर आयोजकांना हे प्रमाणपत्र संबंधित पोलीस प्रशासनाकडे सादर करावे लागेल. या पडताळणीनंतरच कार्यक्रमाला अंतिम परवानगी दिली जाणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश जारी केले आहेत. विशेषतः लावणी कार्यक्रमांमध्ये डीजे संगीताच्या माध्यमातून पारंपरिक कलाप्रकाराचे स्वरूप बदलले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे लावणी कार्यक्रमांमध्ये डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. लोककलेचे मूळ स्वरूप आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चाकणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणी आणि तमाशाला विशेष स्थान आहे. मात्र अलीकडच्या काळात काही ठिकाणी या कलाप्रकारांच्या नावाखाली अश्लील नृत्यप्रकार आणि आक्षेपार्ह सादरीकरण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे पारंपरिक लोककलेची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार आणि विविध संघटनांकडून व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे याबाबत पत्रव्यवहार करून अश्लील ‘डीजे लावणी’ला आळा घालण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सरकारने आता नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने जारी केलेल्या या निर्देशांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कार्यक्रमांच्या परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. पारंपरिक लावणी, तमाशा आणि लोककलेचे पावित्र्य जपत कलाकारांच्या सन्मानाचे संरक्षण करणे, सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि अश्लीलतेला आळा घालणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या नियमांमुळे महाराष्ट्राच्या लोककला परंपरेला अधिक संरक्षण मिळेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version