Manoj Jarange Mumbai Hunger Strike Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाच्या 15 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. सलाईनमुळेच आपण आज बोलू शकत असल्याचं सांगत त्यांनी ही लढाई अंतिम निर्णयाची असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईला जायचं की अंतरवालीतच आंदोलन सुरू ठेवायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित मराठा आंदोलकांना केला. त्यावर उपस्थितांनी मुंबईला जाण्याचा आग्रह धरल्यानंतर जरांगे यांनी मुंबईला जाण्याचं जाहीर केलं.
जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली असून 19 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या या प्रवासात पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या चार ठिकाणी आंदोलकांचा मुक्काम असणार आहे. समाजाच्या भविष्यासाठी ही अंतिम लढाई असून प्रत्येकाने आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडं गांभीर्याने पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर
मुंबईच्या प्रवासाबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार आहे. वाहनांची संख्या लाखोंमध्ये असताना ती 20 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे जातील, त्यामुळं एकाच दिवसात मुंबई गाठणं शक्य नाही. गर्दी हेच समाजाचं बळ असून मुक्काम करत टप्प्याटप्प्याने मुंबईकडं जावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन मार्ग निश्चित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पाटोदा हा पहिला मुक्काम, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दुसरा, हडपसर तिसरा आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली हा चौथा मुक्काम असणार आहे. पुणे परिसरातील आंदोलकांना संधी मिळावी, तसंच खोपोलीमार्गे पुढं जाण्याची मागणी होत असल्याने हा मार्ग निश्चित केल्याचं जरांगे यांनी सांगितलं. खोपोलीनंतर थेट मुंबईतील आझाद मैदान गाठून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
