हायड्रोजन ट्रेनपासून सौरऊर्जेपर्यंत; लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली देशाच्या प्रगतीची कहाणी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या अनेक दशकांत जे काम होऊ शकले नाही, ते पुढील पाच ते सात वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल.

Untitled Design (62)

Untitled Design (62)

Modi narrated the story of the country’s progress : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. या शतकातील पहिली 25 वर्षे पूर्ण झाली असून आता भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी कामाची गती वाढवावी लागेल, असे ते म्हणाले. देशाने आता थांबून चालणार नाही, तर विचार, कार्यपद्धती आणि कामाचा वेग बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या अनेक दशकांत जे काम होऊ शकले नाही, ते पुढील पाच ते सात वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. भारताच्या युवाशक्तीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगताना त्यांनी प्रत्येक क्षेत्रात सुधारणा आणि नव्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मोदी यांनी भारताच्या भविष्यातील विकासासाठी सेमीकंडक्टर, अणुऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा या क्षेत्रांना अत्यंत महत्त्वाचे ठरवले. स्वातंत्र्यानंतर देशात सेमीकंडक्टर उद्योगाबाबत चर्चा होत होती, मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर उत्पादन उभे राहू शकले नव्हते. आजच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल, वाहन उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसाठी चीप अत्यावश्यक बनली आहे. त्यामुळे या क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी भारताने मोठी झेप घेतली असून देशातील पहिल्या मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले असून निर्यातही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील सात ते आठ वर्षांत देशभरात आणखी पाच ते सात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य असल्याची घोषणाही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चाकणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन

ऊर्जा सुरक्षेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अणुऊर्जा हा भविष्यातील महत्त्वाचा ऊर्जा स्रोत ठरणार आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून पुढील दशकात पाच नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचा मानस आहे. फास्ट ब्रीडर अणुतंत्रज्ञानामध्ये भारताने महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे सांगत त्यांनी अणुऊर्जेतील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे नमूद केले.

कच्च्या तेलावरील परावलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचाही मोदी यांनी उल्लेख केला. पूर्वी समुद्रातील मोठा भाग तेल आणि वायू उत्खननासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र सरकारने धोरण बदलत सुमारे 99 टक्के समुद्री क्षेत्र संशोधन आणि उत्खननासाठी खुले केले आहे. यामुळे देशांतर्गत तेल आणि वायू उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ‘समुद्र मंथन’ योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या विकासावर भर देताना मोदी म्हणाले की, 2014 पूर्वी देशातील केवळ 70 शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा होत होता. आज हा आकडा 700 शहरांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे 22 लाख घरांमधून वाढत आता जवळपास पावणेदोन कोटी घरांपर्यंत पाईप गॅस पोहोचवण्यात आला आहे. सौरऊर्जेच्या क्षेत्रातही मोठी झेप घेत भारताची क्षमता 2 गिगावॅटवरून 160 गिगावॅटपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. देशातील 50 लाखांहून अधिक घरांमध्ये सौरऊर्जा पोहोचली असून अनेक कुटुंबे स्वतः वीज निर्मिती करून अतिरिक्त वीज विकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील 30 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकांसह विविध सन्मान

रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा उल्लेख करताना मोदी यांनी सांगितले की, 1925 मध्ये रेल्वे विद्युतीकरणाची सुरुवात झाली होती. मात्र जवळपास 90 वर्षांत केवळ 30 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले होते. गेल्या दशकात देशाने शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे डिझेलवरील खर्च कमी झाला असून पर्यावरणालाही मोठा फायदा झाला आहे. याशिवाय भारताने हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत अभियानाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, गेल्या दशकात देशाने कोरोना महामारी, जागतिक संघर्ष आणि पुरवठा साखळीतील अडचणींसारखी अनेक संकटे पाहिली. त्या काळात पेट्रोल, डिझेल, खते, औषधे आणि तंत्रज्ञान यांचा अनेक देशांनी दबावाचे साधन म्हणून वापर केला. मात्र आत्मनिर्भरतेच्या धोरणामुळे भारत या संकटांचा यशस्वीपणे सामना करू शकला. आजही देशातील शेतकऱ्यांना युरियाची गोणी अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांनाही विशेष आवाहन केले. भारताने केलेले व्यापारी करार आणि जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या नव्या संधींचा लाभ उद्योगांनी घ्यावा, असे ते म्हणाले. भारतीय उत्पादनांनी जागतिक दर्जा गाठत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक प्रभावीपणे पोहोचले पाहिजे. दर्जेदार आणि स्पर्धात्मक दरातील उत्पादने तयार करून ‘मेड इन इंडिया’चा झेंडा जगभर फडकवण्याचे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केले.

विकसित भारत, आत्मनिर्भरता, ऊर्जा सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील विस्तार या पाच प्रमुख स्तंभांवर आगामी भारताची वाटचाल आधारित असेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना नव्या संकल्पांसह पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

Exit mobile version