MPSC Exam Offline : एमपीएससीच्या परीक्षांमधील (MPSC) कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळं राज्यातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळात नाराजीचं वातावरण आहे. काही प्रकरणांमध्ये आयोग आणि सरकारकडुनही चुकांबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी आणि विरोधकांकडुन केली जात असुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्याचं मान्य केलं आहे. यामध्ये यापुढील एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
दुष्काळाच्या पंचनाम्याला वेग; 265 तालुक्यांत प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, कशी होणार नोंद?
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं आहे. यासोबतच एमपीएससीच्या यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येतील, असंही त्यांनी सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. राज्यातील सर्व रिक्त पदं लवकरच भरली जातील, तसंच परीक्षेसंदर्भात सिंगल कार्ड यंत्रणा उभी करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाल्याचं विद्यार्थ्यांनी बैठकीनंतर सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बैठकीत चर्चा झाली असुन काही अधिकाऱ्यांची 3 महिन्यांत चौकशी करण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. अध्यक्षांचा राजीनामा होण्यापुर्वी 3 महिन्यांची न्यायालयीन चौकशी होणार असुन सचिवांची बदली केली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच येत्या 2 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणारं आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं. आता एमपीएससीच्या कामकाजात नेमके कोणते बदल होतात, तसंच रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतात, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
