पुण्यात DJवरून वाद, नागपुरात थेट बंदी! नांगरे पाटलांचा कडक आदेश; नियम मोडल्यास वाहनेही होणार सील

एकीकडे पुण्यात गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून वाद चिघळलेला असताना नागपूर पोलिसांनी थेट कठोर पाऊल उचलले आहे.

Untitled Design   2026 09 03T164717.795

Untitled Design 2026 09 03T164717.795

Nangre Patil’s strict order : आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अवाजवी डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हे निर्बंध 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. एकीकडे पुण्यात गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून वाद चिघळलेला असताना नागपूर पोलिसांनी थेट कठोर पाऊल उचलले आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील आणि नियमबाह्य साऊंड सिस्टीमच्या वापराला लगाम बसणार आहे.

वाहनांवर DJची ‘भिंत’ उभारल्यास थेट कारवाई

पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेत टॉप, मिड आणि बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टीमसह प्लाझ्मा आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अनेकदा वाहनांवर एकावर एक स्पीकरचे थर चढवून एखाद्या भिंतीप्रमाणे मोठी साऊंड सिस्टीम उभारली जाते. त्यासाठी वाहनांच्या मूळ रचनेतही बेकायदेशीर बदल केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

बापटांच्या कानाखाली लगावली, अटकेनंतरही संतोष चव्हाण आक्रमक; म्हणाला, ‘आणखी मारायला पाहिजे’

अशा साऊंड सिस्टीममुळे निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच मंडळांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची मल्टी-लेयर साऊंड सिस्टीम असलेली किंवा त्यासाठी रचनेत बेकायदेशीर बदल केलेली वाहने आढळल्यास ती जागेवरच सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियम पाळणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला सूट

दरम्यान, ही बंदी सर्वच प्रकारच्या साऊंड सिस्टीमवर लागू होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत डेसिबल मर्यादेचे पालन करणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमला या कारवाईतून सूट मिळणार आहे. त्यामुळे नियमबाह्य आणि अवाजवी आवाज करणाऱ्या डॉल्बी तसेच मल्टी-लेयर साऊंड सिस्टीमवर प्रामुख्याने कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

विद्यानंद बापटांना मारहाण म्हणजे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण; रोहित पवार भडकले

नागपुरात DJ बंदीसाठी चळवळ

नागपुरात DJ आणि लेझर लाईटच्या वापराविरोधात माजी आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनीही पुढाकार घेतला आहे. सण-उत्सवांमध्ये DJच्या प्रचंड आवाजामुळे नागरिकांच्या कानांवर, तर घातक लेझर लाईटमुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी DJ आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी असावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी केली आहे. सर्व धर्मीयांनी आपापले सण आनंदाने साजरे करावेत; मात्र त्यासाठी पारंपरिक बँड, ढोल-ताशांसारख्या वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

नागपूर पोलिसांच्या या निर्णयामुळे आगामी सण-उत्सवांमध्ये नियमबाह्य DJ आणि डॉल्बी सिस्टीमच्या वापरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट कारवाईचे संकेत दिल्याने आता मंडळे आणि आयोजकांना ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

Exit mobile version