बापटांच्या कानाखाली लगावली, अटकेनंतरही संतोष चव्हाण आक्रमक; म्हणाला, ‘आणखी मारायला पाहिजे’
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असल्याचे समोर आले असून, घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.
Santosh Chavan remains aggressive even after arrest : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रोड परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली. एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसोबत बापट संवाद साधत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्या कानाखाली मारली. कॅमेऱ्यासमोरच घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असल्याचे समोर आले असून, घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.
विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष चव्हाणने आक्रमक वक्तव्य केले. तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे. मला काही भूमिका मांडायची नाही. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार, असे चव्हाणने म्हटले. त्याच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात DJ वादाला हिंसक वळण! कॅमेऱ्यासमोर विद्यानंद बापटांना मारहाण; सुप्रिया सुळे संतापल्या
हल्ल्यानंतर पुणे पोलीस काय म्हणाले?
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे. बापट यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, आरोपी कोणत्या हेतूने त्या ठिकाणी आला होता, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती डीसीपी कृषीकेश रावळे यांनी दिली. विद्यानंद बापट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन बापट यांना पोलीस सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे की नाही, याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांची प्रतिक्रिया
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली. आपण प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संबंधित व्यक्तीने अचानक हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक व्यक्ती आली आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो आणि जवळ पोलीसही नव्हते हे पाहून हा हल्ला करण्यात आला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. संपूर्ण घटनेचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध आहे. ते पाहून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी बापट यांनी केली.
“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…” विद्यानंद बापटांचा श्लोक व्हायरल; त्यांनीच सांगितला श्लोकचा अर्थ
दरम्यान, गणेशोत्सवाला आपला कोणताही विरोध नसल्याचे बापट यांनी पुन्हा स्पष्ट केले. उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, एवढेच माझे म्हणणे आहे. उत्सव साजरा करण्याला माझा आक्षेप नाही, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुण्यात आधीच वाद सुरू असताना आता विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. त्यातच आरोपी संतोष चव्हाणने हल्ल्यानंतर केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे प्रकरण आणखी चर्चेत आले आहे. आता हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता आणि पोलिसांच्या तपासातून आणखी काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.