नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द! शरद पवार 12 डिसेंबरला करणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास तरी रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.

Untitled Design   2026 11 20T151056.344

Untitled Design 2026 11 20T151056.344

Narendra Modi’s visit to Baramati cancelled for now : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित बारामती दौरा तूर्तास तरी रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच मोदींचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, आता या प्रेरणास्थळाचे उदघाटन शरद पवार स्वतः करणार आहेत. येत्या 12 डिसेंबर रोजी, आपल्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची नवी तारीख आज निश्चित होणार असल्याची चर्चा होती. यासंदर्भात शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार उपस्थित होते. बैठकीनंतर शरद पवार यांनी मोदींचा दौरा तूर्तास रद्द झाल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी मोदींचा बारामती दौरा नियोजित होता. मात्र, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर दौऱ्याची नवीन तारीख जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता शरद पवारच 12 डिसेंबरला प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

विजय सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका! कावेरीच्या 11 टीएमसी पाण्याची मागणी फेटाळली, कर्नाटकाला दिलासा

आज शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात दाखल झाले होते. मोदींचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार गोविंदबाग येथील निवासस्थानी रवाना झाले. तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर आला आहे. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा निश्चित झाल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, आता हा दौरा तूर्तास रद्द झाल्याने या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे 12 डिसेंबरच्या प्रेरणास्थळाच्या उद्घाटन सोहळ्याकडे आणि राष्ट्रवादीच्या आगामी राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version