४०० कोटी रोख रक्कम घेऊन जाणारे २ कंटेनर लुटल्याचा आरोप; तरुणाचे अपहरण, मारहाण प्रकरणामुळे राज्यात खळबळ

१६ ऑक्टोबर रोजी गोव्यातून कर्नाटकमार्गे जाणारे दोन कंटेनर बेळगाव-गोवा मार्गावरील चोरली घाटात लुटण्यात आले. या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोकड होती

Abnoname

Abnoname

Nashik 400 Crore Cash Container Robbery Kidnapping Case : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्याच पार पडल्या. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आले आहे. ४०० कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर लुटल्याच्या आरोपावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी नाशिकमधील तरुण संदीप पाटील असून, या घटनेमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार, १६ ऑक्टोबर रोजी गोव्यातून कर्नाटकमार्गे जाणारे दोन कंटेनर बेळगाव-गोवा मार्गावरील चोरली घाटात लुटण्यात आले. या कंटेनरमध्ये बंद करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोकड होती, असा दावा करण्यात येत आहे. या पैशांचा मूळ मालक ठाण्यातील एक बिल्डर असल्याचेही सांगण्यात येते.

संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबरच्या रात्री जयश कदम याने व्हॉट्सॲप कॉल करून “तुझ्या नावाने तक्रार आली आहे, चौकशीसाठी भेटायचं आहे” असे सांगत त्यांना बोलावले. २१ ऑक्टोबरला दिवाळी असल्याने संदीप पाटील २२ ऑक्टोबर रोजी घोटी येथे गेले असता, काही जणांनी त्यांना बळजबरीने फॉर्च्युनर गाडीत बसवून नाशिककडे नेले.

प्रवासादरम्यान, “तूच भाऊ पाटील आहेस का?”, “तूच आमच्या शेटचा कंटेनर लुटलास का?”, “आरोपी तुझ्याच नावाने फोन करत आहे” असे प्रश्न विचारत त्यांना मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा गंभीर आरोप संदीप पाटील यांनी केला आहे. तसेच १०० कोटी रुपये लुटल्याचा आरोप करत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात जयश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. एका आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी हे प्रकरण आर्थिक आणि संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले आहे. बेळगाव आणि नाशिक पोलीस परस्पर समन्वयाने तपास करत असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version