Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यात ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानपाडा-मनोरमा नगर परिसरातील त्यांच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी राजकीय कटाचा संशय व्यक्त केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने ठाण्याच्या माजी महापौर, शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी राजेंद्र शिंदे आणि हल्ल्यातील संशयितांची बैठक झाल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. तसेच आपल्या वडिलांना संभाव्य हल्ल्याची आधीच भीती असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रेमसंबंधातून वाद पेटला; आईच्या प्रियकरावर मुलानं झाडली गोळी
राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या पप्या शिंदेचा त्यांच्या वडिलांशी पूर्वीपासून परिचय होता. हल्ल्याच्या काही दिवस आधी तो पूर्णेकर यांच्या कार्यालयात आला होता, असा दावाही त्यांनी केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या काही तास आधीच्या इन्स्टाग्राम पोस्टचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या एका रिलमध्ये ‘एक बडा डाव खेलना है इस बार… ज्यादा से ज्यादा क्या होगा, या तो अपना अध्याय समाप्त, या फिर एक नये अध्याय का प्रारंभ’ असा ऑडिओ वापरण्यात आला होता. त्यानंतरच्या आणखी एका रिलमध्ये ‘जातिवंतांना अडचणीच्या काळात प्यायला दिलेल्या पाण्याचीही जाण असते, पण गद्दारांना रक्त दिले तरी त्याची जाण नसते’ असा आशय होता. या पोस्टचा हत्येशी थेट संबंध असल्याचे सध्या सिद्ध झालेले नाही, मात्र हत्येनंतर या पोस्टकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे.
हल्ल्याच्या वेळी परिसरात असलेल्या रेणू प्रजापती यांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्यानंतर पळ काढताना त्यांना पाहिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
एआयचं नाव बदललं, आता ‘या’ नावाने ओळखलं जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
पोलिसांच्या तपासानुसार, प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. हत्येचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून राजकीय वैमनस्यासह इतर शक्यतांचाही तपास केला जात आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याआधी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीटी स्कॅन करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये पूर्णेकर यांना लागलेल्या चार गोळ्यांपैकी एक गोळी मानेतून आरपार गेल्याचं, तर दुसरी गोळी छातीत अडकून राहिल्याचं समोर आलं आहे. आता शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण स्पष्ट होणार आहे.
प्रत्येक गोष्टीत अजेंडा, आम्ही उत्तर प्रदेश पोलीस बरखास्त करु; सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
दरम्यान, हत्येनंतर मनोरमा नगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून दुकाने आणि तीन शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी नऊ पथकं तैनात केली आहेत. आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शिंदे दाम्पत्याची चौकशी केली जाणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे.
