पुणे रन फॉर युनिटीवरून राजकीय रणकंदन! 50 लाखांच्या खर्चावरून धंगेकरांचा मोहोळांवर हल्लाबोल

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Untitled Design   2026 11 16T075824.263

Untitled Design 2026 11 16T075824.263

Ravindra Dhangekar’s question to Muralidhar Mohol : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मॅरेथॉनच्या आयोजनासाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च करण्याची गरज काय, असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर महापालिका आयुक्तांनी या आयोजनासाठी 50 लाख रुपये दिले तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी महापालिका प्रशासनालाही धारेवर धरले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’ या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या मॅरेथॉनमध्ये 40 हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे केनियासह विविध आफ्रिकन देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

अलका टॉकीज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि पाषाण रस्ता अशा पुण्यातील प्रमुख मार्गांवरून धावपटूंनी धाव घेतली. राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि नशामुक्त समाजाचा संदेश देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंची उपस्थिती यामुळे या उपक्रमाची शहरात चर्चा झाली. मात्र, आता याच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झालेल्या खर्चावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

पावसाळी बेडकाप्रमाणे बाहेर पडतात राज ठाकरे; छठ पूजेच्या विरोधानंतर लालूप्रसाद यादवांच्या मुलीचा टोला

पुणे महानगरपालिकेने या आयोजनासाठी संस्कृती प्रतिष्ठानला 50 लाख रुपये दिल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर धंगेकर यांनी या खर्चावर आक्षेप घेतला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना अशा कार्यक्रमांवर सार्वजनिक निधी खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी केला आहे. मॅरेथॉन आयोजित करण्यास विरोध नसून त्यासाठी जनतेच्या पैशांचा वापर कितपत योग्य आहे, हा प्रश्न असल्याचे त्यांच्या टीकेतून स्पष्ट होत आहे.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ अशी बोचरी टीका करत धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. तसेच, महापालिका आयुक्तांनी या खर्चाला मंजुरी कशी दिली आणि कोणत्या निकषांवर 50 लाख रुपये देण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या निधीच्या मंजुरीची प्रक्रिया, खर्चाचे स्वरूप आणि त्यामागील प्रशासकीय निर्णय यावरही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धंगेकरांच्या या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काय प्रत्युत्तर देणार, याकडे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका प्रशासन या खर्चाबाबत काय स्पष्टीकरण देणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ‘पुणे रन फॉर युनिटी’ची चर्चा आता मॅरेथॉनच्या आयोजनापेक्षा 50 लाखांच्या खर्चावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षामुळे अधिक रंगताना दिसत आहे.

Exit mobile version